ROHINI RAUT
ROHINI RAUT

चार वर्षांच्या "ब्रेक'नंतर धावपटू रोहिणी करणार "सेकंड इनिंग' ला सुरवात 

नागपूर : तब्बल तेरा वर्षापूर्वी अम्मान (जॉर्डन) येथे आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत ज्युनिअर गटात बहीण मोनिका पाठोपाठ रौप्यपदक जिंकून प्रकाशझोतात आलेली आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी राऊत चार वर्षांच्या ब्रेकनंतर आपल्या "सेकंड इनिंग' ला सुरवात करणार आहे.

अम्मान येथे मोनिकाने 20 वर्षाखालील मुलींच्या सहा किलोमीटर शर्यतीत सुवर्ण तर रोहिणीने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर रोहिणीने विविध राष्ट्रीय आणि आंतर विद्यापीठ स्पर्धेत पदके जिंकली. 2009 मध्ये बहरीन येथे झालेल्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेतही दोघी सहभागी झाल्या होत्या. तब्बल सात वेळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा जिंकण्याचा विक्रम रोहिणीच्या नावावर आहे. मात्र, रिओ ऑलिंपिंकची पात्रता गाठण्यासाठी रोहिणी फेब्रुवारी 2016 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाली होती. याच स्पर्धे दरम्यान तिची उत्तेजक चाचणी घेण्यात आली आणि यात ती दोषी आढळली.

पतीचाही पाठिंबा 
तिच्या नमुन्यात नोरॅनड्रोस्टेरोन हे उत्तेजक सापडले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या ऍथलेटिक इंटिग्रिटी युनिटने तिच्यावर चार वर्षांची बंदी टाकली. ही बंदी येत्या 22 मार्च रोजी संपत आहे. काही महिन्यापासून तिने ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर सरावही सुरू केला. नुकतीच चार मार्च रोजी ती सांगली येथील मल्लिकार्जून पाटील यांच्याशी विवाहबद्ध झाली. चार वर्षाची बंदी संपणार आहे याविषयी जीएसटीमध्ये कार्यरत असलेली रोहिणी सांगली येथून बोलताना म्हणाली, जे घडून गेले त्याविषयी फार विचार करत नाही. गेल्या चार वर्षात फार त्रास झाला नाही कारण ही चार वर्षे मी सत्कारणी लावली. एमपीएससीचा अभ्यास केला आणि जीएसटीमध्ये नोकरी मिळवली. त्यामुळे एकप्रकारे चांगलेच झाले असे म्हणेल.

सराव सुरू केला आहे, लवकरच स्पर्धेत सहभागी होणार काय? असे विचारल्यावर ती म्हणाली, काही महिन्यापूर्वी हलका सराव सुरू केला. येथे पती आणि सासरच्यांचा पाठिंबा आहे. मात्र, अजून नेमके कोणत्या स्पर्धेत, कुठल्या इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचे याविषयी काहीच ठरविले नाही. याविषयी घरची जबाबदारी विचारात घेऊन निर्णय घेईल. आणि परिवाराचा रोहिणीच्या सरावाला आणि स्पर्धेत भाग घ्यायला पाठिंबाच आहे. तिने पुन्हा नव्या जोमाने सराव करावा आणि यश संपादन करावे, ही इच्छा आहे. 
- मल्लिकार्जून पाटील, रोहिणीचे पती 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com