`ते` एटीएम चोरून न्यायचे, असे केले जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पिकअप व्हॅन खापा टी पॉइंटकडून पाटणसावंगीकडे जाताना पोलिसांना दिसली. या व्हॅनमध्ये एटीएम चोर असावेत असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी व्हॅनचा पाठलाग सुरू केला.

नागपूर : नागपूर जिल्ह्यात एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या राजस्थानच्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली, अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रपरिषदेत दिली. बहादूर पेहलादराम बावरी (30) रा. कुलियाना, जि. नागौर, गोपालराम तेजाराम बावरी (23), तुफान हनुमानराम बावरी (20) राहुलीयावास, जि. नागौर आणि श्रीनिवास बंतालाल बावरी (26) नांद, जि. अजमेर (राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

गेल्या तीन महिन्यांपासून या टोळीने नागपूर ग्रामीणसह वर्धा जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. या टोळीने 11 ऑक्‍टोबर 2019 रोजी खापरखेडा परिसरातील दहेगाव (रंगारी) येथून पिकअप व्हॅन चोरली होती. त्यानंतर 13 ऑक्‍टोबर रोजी काटोल येथून एटीएम मशीन चोरून 16 लाख रुपये चोरून नेले होते. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी काटोल येथून पिकअप व्हॅन चोरली आणि बाजारगाव येथील एटीएम चोरत असताना पोलिसांचे वाहन गस्त घालत तेथे आल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. 6 डिसेंबर रोजी पाटणसावंगीत एटीएम चोरून 2 लाख 83 हजार रुपये, 30 डिसेंबरला वाडीतील एटीएम चोरून 4 लाख रुपये, 1 जानेवारी 2020 रोजी सेवाग्राम (जि. वर्धा) येथील एटीएम चोरले तर सेलू (जि. वर्धा) येथील एटीएम चोरून 6 लाख 94 हजार रुपये चोरून नेले होते. पिकअप व्हॅन चोरी झाली की एटीएम चोरी होत असल्याची बाब लक्षात येताच 24 जानेवारी रोजी दहेगाव येथून एक पिकअप व्हॅन चोरीला गेली होती. मात्र, ही व्हॅन रस्त्यातच पिपळा शिवारात बंद पडली. त्यामुळे आरोपींनी ती व्हॅन तेथेच सोडून त्याच रात्री दहेगाव येथील वैभव कृषी सेवा केंद्रासमोरून एमएच 40 वाय 3544 क्रमांकाची महिंद्रा बोलेरो पिकअप व्हॅन चोरली. पिकअप व्हॅन चोरीला गेल्याचे समजताच कुठेतरी एटीएम चोरीला जाणार अशी शंका पोलिसांना होती. त्यानुसार ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय अनिल जिट्टावार, सचिन मत्ते यांच्या तीन पथकांना 25 जानेवारीच्या रात्री ग्रामीण परिसरात पाठविले. पिकअप व्हॅन खापा टी पॉइंटकडून पाटणसावंगीकडे जाताना पोलिसांना दिसली. या व्हॅनमध्ये एटीएम चोर असावेत असा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी व्हॅनचा पाठलाग सुरू केला. पोलिसांना पाहून चोरांनी अतिशय वेगात आपले वाहन पळविले. कळमेश्वर हद्दीतील कळंबी या गावाजवळ बहादूर बावरी हा धावत्या वाहनावर चढला आणि पोलिसांचे वाहन पंक्‍चर करण्यासाठी तो रस्त्यावर आरी, खिळे फेकू लागला. बहादूरने धावत्या वाहनातून उडी घेऊन अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला पकडले. 

तिघांना रेल्वेस्थानकावरून अटक 
आरोपी हे राजस्थानला पळून जाणार याची खात्री पोलिसांना होती. त्यानुसार सकाळपासूनच नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास एका ऑटोतून गोपालराम, तुफान आणि श्रीनिवास हे रेल्वेस्थानकावर आले असता दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. 

मास्टरमाइंड फरार 
टोळीचा मास्टरमाइंड भंवरलाल चौधरी हा राजस्थानचा राहणारा असून मागील पाच-सहा वर्षांपासून तो खाप्यात ट्रॅक्‍टर ड्रायव्हर म्हणून काम करतो. भवरलालने या टोळीला नागपूरला बोलावून घेतले होते. आरोपींनी दवलामेटी येथे दोन ठिकाणी खोल्या किरायाने घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे वर्धा येथे फार्महाउसमध्ये खोली किरायाने घेतली होती. एटीएम चोरून नेल्यानंतर किरायाने घेतलेल्या खोलीत नेऊन तेथे एटीएम फोडत असत. बहादूरवर एटीएम चोरीचे 10 व इतर 4 असे 14 गुन्हे, गोपालरामवर वाहनचोरीचे 8 आणि श्रीनिवासवर एटीएम चोरीचे 9 व इतर चोरीचे असे 13 गुन्हे दाखल आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, atm, thief, crime, rajasthan