नागपुरात "लॉकडाउन', आरोग्य सेवा, बॅंक, पेट्रोलपंप, मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार "कोरोना'वर प्रतिबंध घालण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनासंदर्भात आयुक्तांनी आज साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करीत कडक निर्बंध जाहीर केले. या कायद्यानुसार, ज्या भागात आयसोलेशन सेंटर, कोरेंटाइन सेंटर घोषित करण्यात आले आहे, अशा भागात वाहनांच्या आवागमनावर पूर्णत: प्रतिबंध घालण्यात आला आहे.

नागपूर : शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झाल्याचे नमूद करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यावश्‍यक सेवावगळता खासगी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिस बंद करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, सभागृह, मॉल, उद्याने, स्वीमिंग पूल यापूर्वीच बंद करण्यात आले असून नागरिकांनी आवश्‍यकता असेल, तरच बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले. कायद्याची अंमलबजावणीसाठी मनपा सहायक आयुक्तांपासून ते पोलिस अधिकाऱ्यांची नजर राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार "कोरोना'वर प्रतिबंध घालण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनासंदर्भात आयुक्तांनी आज साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करीत कडक निर्बंध जाहीर केले. या कायद्यानुसार, ज्या भागात आयसोलेशन सेंटर, कोरेंटाइन सेंटर घोषित करण्यात आले आहे, अशा भागात वाहनांच्या आवागमनावर पूर्णत: प्रतिबंध घालण्यात आला आहे. शाळा, थिएटर, जलतरण, जिम, मॉल्स, स्पा सेंटर, क्‍लब्स, पब्ज, अम्युजमेंट पार्क आदी बंद करण्यासोबतच गर्दी होणारे कार्यक्रम यापूर्वीच रद्द करण्यात आले. आज, आतापासून संपूर्ण खासगी, कॉर्पोरेट कंपनी आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. 

मॉर्निंग वॉक बंद 
नागरिकांनी मॉर्निंग वॉक, जॉगिंगलाही बाहेर पडू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले. यावर महापालिका अधिकाऱ्यांसह पोलिसांची गस्त सुरू राहील. कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे संकेत त्यांनी दिले. आठवडीबाजारही बंद करण्यात येईल. 

कायद्याची पायमल्ली केल्यास कारावास 
शहरात आजपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कायदा मोडल्यास 1 महिन्याच्या कारावासाची तरतूद असल्याचे ते म्हणाले. 

कुठेही थुंकणाऱ्यांवर एक हजाराचा दंड 
रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. मनपाच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांना यासंदर्भात दंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. 

या सेवा सुरू राहतील 
पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, बॅंक, टेलिफोन, इंटरनेट, पेट्रोलपंप, वीजपुरवठा, माध्यमे, मेडिकल स्टोअर्स, दूध, भाजी, किराणा दुकाने, दवाखाने, तंत्रज्ञान सेवा, सिलिंडर, बससेवा, रेल्वे, खाद्यपदार्थांची होम डिलिवरी, हॉटेल बंद असले तरी खाद्यपदार्थांची होम डिलिवरी करू शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur city lockdown emmergency services open