हाच खरा कोरोना फायटर : जनता कर्फ्यूत दिली अंत्यसंस्कारासाठी सेवा

राघवेंद्र टोकेकर 
सोमवार, 23 मार्च 2020

दक्षिण पश्‍चिम नागपुरात साधारणत: चार मृत्यूंची नोंद आहे. नरेंद्रनगर, शंकरनगर, प्रतापनगर व गोपालनगर भागातील या घटना असल्याची माहिती शववाहिका चालक अरविंदने दिली. अनेकांचे सकाळी फोन खणाणले. प्रत्येकालाच काळजी होती ती "जनता कर्फ्यू'ची. त्यामुळे अरविंदने सांगितलेल्या किमतीला प्रत्येकाने होकार कळवला.

नागपूर : "इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते' कविवर्य सुरेश भट यांची ही कविता रविवारी अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या प्रत्येकाला आठवली असेल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी शहरात कडेकोट बंद पाळला. मात्र, ऐन "जनता कर्फ्यू'त ज्यांच्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाले, त्यांच्यावर जणू समस्यांचा डोंगर कोसळला. अंत्यसंस्कार करायचे कसे, खांदे देण्यासाठी लोक पुढे सरसावणार का, ही चिंता असताना अरविंद मात्र कोरोना फायटर बनून दिवसभर अंत्यसंस्कारात व्यस्त होता. 

शहरातील दिवसाला मृत्यू पावणाऱ्यांची संख्या तशी मोठी आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला आप्तेष्ट जमतात. मात्र, सध्याचे दिवस तसे नाहीत. कोरोनाची दहशत असल्याने केवळ सुरक्षितता म्हणून नागरिक मृत्युघरी जाणे टाळत आहेत. रविवारी मृत्यू पावलेल्यांच्या घरीदेखील हेच चित्र पाहावयास मिळाले. ज्याने कधीही चार माणसे जमवली नाहीत, त्यांच्याबाबत विचार न करणेच बरे. आप्टे पकडण्यासाठी आणि तिरडी खांद्यावर घेण्यासाठी पाच माणसे जमली तरी खूप झाले म्हणायचे. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एक तरुण दिवसभर राबत होता. त्याचे नाव आहे अरविंद. 

दक्षिण पश्‍चिम नागपुरात साधारणत: चार मृत्यूंची नोंद आहे. नरेंद्रनगर, शंकरनगर, प्रतापनगर व गोपालनगर भागातील या घटना असल्याची माहिती शववाहिका चालक अरविंदने दिली. अनेकांचे सकाळी फोन खणाणले. प्रत्येकालाच काळजी होती ती "जनता कर्फ्यू'ची. त्यामुळे अरविंदने सांगितलेल्या किमतीला प्रत्येकाने होकार कळवला. अंबाझरी घाटावरील झेप युवा प्रतिष्ठानच्या शववाहिकेत तिरडी आणि एकूणच अंत्यसंस्काराचे सामान घेऊन अरविंद सहकाऱ्यांसोबत दिवसभर फिरत होता. महत्त्वाचे म्हणजे, शनिवारी मृत्यू पावलेल्या एका कुटुंबाकडे रात्रीच फ्रीजर पोहोचविल्याचे त्याने सांगितले. 

अनेकांना डिझेल शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळे प्रत्येकच मृतदेहाचा क्रम लावणे अरविंदपुढचे आव्हान होते. अरविंद स्वत:ची पूर्णत: काळजी घेत होता. तिरडी बांधून झाली की, "बॉडी खाली घेऊन या', "विधी झाले की, बॉडी तिरडीवर ठेवा', अशा सूचना तो जमलेल्या चार नातलगांना द्यायचा. व्यक्‍तीच्या जाण्याचे कारण काय असावे, हा प्रश्‍न अरविंदच्या मनातदेखील होता. 

- मित्रासोबत जात होती देवदर्शनाला, रस्त्यात घडले अघटीत...
 

रघुनाथ पंडित यांची "कठीण समय येता कोण कामास येतो?' ही रचना प्रत्येकाला आठवेल इतकी भयाण स्थिती देशात आहे. देशात कोरोनाचे सावट असताना जीवनावश्‍यक सुविधा, वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या नागरिकांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी उत्साहाने टाळ्या वाजविल्या. पण, जेथे चार माणसे जमवणे कठीण, अशा कार्यासाठी अरविंदचा पुढाकार लाखमोलाचा आहे. 

देश कोरोनाच्या भीतीने घरात बसला असताना मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करायचे कोणी? शववाहिका चालविणे, अंत्यसंस्काराचे सामान विकणे हा व्यवसाय असला, तरी मानवी संवेदना आम्हालाही असतात. अशा भयाण स्थितीत आमचीही दखल घेणाऱ्यांचे आभार मानतो. 
- अरविंद, शववाहिका चालक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur corona fighter arvind