पीपीई किट घालून करावे लागले अंत्यसंस्कार, नातेवाइकांनाही करता आला नाही स्पर्श

nagpur corona funeral
nagpur corona funeral

नागपूर : कोरोनाचा शहरातील पहिला बळी ठरलेल्या 68 वर्षीय वृद्धावर आज भंडारा मार्गावरील एका स्मशानभूमीत आरोग्यविषयक सर्व सुरक्षा बाळगत अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाइकांनाही लांब ठेवत महापालिकेच्या घाटावरील चार कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीची प्रक्रिया एका तासात पूर्ण केली. चारही कर्मचाऱ्यांनी "पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट' (पीपीई) किट घालून अंत्यसंस्कार केले. कोरोनाग्रस्त मृतदेहापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी पार्थिवासह वाहून नेणारे वाहन, खड्ड्यातही सोडिअम हायपोक्‍लोराइड शिंपडण्यात आले. 

शहरात कोरोनाने एका वृद्धाला कवेत घेतले. 5 एप्रिलला रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास या वृद्धाचा मेयोत मृत्यू झाला होता. काल सोमवारी या वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या या वृद्धाचे पार्थिव मेयो प्रशासनाने दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पालिका कर्मचारी व नातेवाइकांकडे सोपविले.

वृद्धाचे पार्थिव विशिष्ट पट्टीने गुंडाळले होते. त्यानंतर चार पदरी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळण्यात आले होते. मृतकाचे पार्थिव घरी न नेता पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जैविक कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाने थेट भंडारा रोडवरील स्मशानभूमीत नेले. सतरंजीपुरा झोनचे झोनल आरोग्य अधिकारी आत्राम यांनी या पार्थिवाच्या विल्हेवाटीसाठी गांधीबाग तसेच सतरंजीपुरा झोनमधील अनुक्रमे गंगाबाई घाट व शांतीनगर घाटावरील कर्मचाऱ्यांना बोलावले. मेयो व मनपा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली पीपीई किट या कर्मचाऱ्यांनी घातली. त्यानंतरच पुढील प्रक्रिया करण्यात आली. तत्पूर्वी मृतदेह पुरण्यासाठी जेसीबीने खोल खड्डा खोदण्यात आला. 

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चारच्या सुमारास मृतदेह खड्ड्यात पुरला. मृतदेह पुरल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी खड्ड्यावरही औषध फवारणी करण्यात आली. यावेळी सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, झोनल आरोग्य अधिकारी आत्राम यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या देखरेखीत संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पालिकेचे अधिकारी व वाहनांसह झोनमध्ये पोहोचले. झोनमध्ये जेसीबी, मृतदेह वाहून नेणाऱ्या वाहनांवरही औषध फवारणी करून सुरक्षितता पाळण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मृतकाच्या नातेवाइकांना लांब ठेवण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मृतदेहाला स्पर्श करण्यापासूनही मज्जाव करण्यात आला. 

रस्त्यांवरील वाहने हटविली 
मेयो ते भंडारा रोडवरील स्मशानभूमीपर्यंत मृतदेह नेताना रस्त्यांवरील सर्व वाहने हटविण्यात आली. कुणाचीही वाहने या रस्त्यांवर दिसू नये, यासाठी मनपा अधिकारी आवाहन करताना दिसून आले. मृतदेह वाहून नेणारे तसेच मनपा अधिकाऱ्यांची वाहने यातही पाच मीटरपेक्षा जास्त अंतर बाळगण्यात आले होते. 

मृतदेहाच्या विल्हेवाटीबाबत मार्गदर्शक तत्त्वे 

- मृतदेहाला कुणीही स्पर्श करू नये 
- मृतदेहावर अंत्यविधी करताना पाचपेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये 
- संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी 
- मृतदेहाला स्पर्श आणि अंत्यविधीला पाच उपस्थितांची खातरजमा झाल्यानंतरच पार्थिव सुपूर्द करणे 
- घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मास्क, हातमोजे आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करावा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com