Nagpur Corona Updates new 6489 corona patients and 64 deaths today
Nagpur Corona Updates new 6489 corona patients and 64 deaths today

कोरोनाची महात्सुनामी! नागपुरात दर दोन तासाला ५ जणांचा मृत्यू; आज नवे साडे ६ हजार रुग्ण 

नागपूर ः कोरोनाने जिल्ह्याला विळखा घट्ट केला असून गेल्या चोविस तासांंमध्ये दर दोन तासांला पाच जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. बाधितांच्या संख्येनेही नवा उच्चांक गाठला. जिल्ह्यात आज गेल्या वर्षभरात एका दिवसातील सर्वाधिक ६ हजार ४८९ बाधित आढळून आले. सतत ६० पेक्षा जास्त मृत्यू व पाच ते साडेसहा हजारांपर्यंत बाधितांच्या संख्येने प्रशासनाच्या उपाययोजनेच्याही चिंधड्या उडविल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सामान्य नागरिकांतही दहशत असून चाचणी केंद्रांवरही रांगा दिसून येत आहे.

कोरोनाने विक्राळ रूप धारण केल्याचे आज आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून अधोरेखित झाले. गेल्या चोविस तासांमध्ये बाधितांचे एका दिवसातील सर्वच आकडे मागे पडले असून शुक्रवारी ६ हजार ४८९ बाधित आढळून आले. यात एकाच दिवशी शहरातील बाधितांची संख्या ४ हजारांवर असून एकूण संख्या दोन लाखांवर पोहोचली. शहरातील एकूण बाधितांची संख्या २ लाख ३ हजार ६३० पर्यत पोहोचली. २ हजार ४६६ बाधितांमुळे ग्रामीण भागातही स्थिती भयावह असल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामीण भागातील बाधितांच्या संख्येनेही ६० हजारांचा आकडा मागे टाकला. ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण ६१ हजार ५१२ बाधित आढळून आले. गुरुवारी कोरोनाबळींची संख्या सर्वाधिक ७३ होती. गेल्या चोविस तासांत यात घट होऊन ही संख्या ६४ पर्यंत खाली आली. परंतु गेल्या नऊ दिवसांत तीन दिवसांचा अपवाद वगळता दररोज ६० पेक्षा जास्त बळी जात असल्याने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

आज नोंद झालेल्या ६४ बळींमध्ये शहरातील ३७ तर ग्रामीणमील २० जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील सात जणांचा शहरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची एकूण संख्या ५ हजार ६४१ पर्यंत पोहोचली. यात शहरातील ३ हजार ५३५ तर ग्रामीण भागातील १ हजार २०६ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील एकूण मृत्यूची संख्या ९०० पर्यंत पोहोचली. दरम्यान, आज विक्रमी २२ हजार ७९७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.

कोरोनामुक्तांचा निचांक

आज बाधितांच्या संख्त साडेसहा हजाराने भर पडली. परंतु कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या केवळ २ हजार १७५ आहे. बाधितांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला त्याचवेळी कोरोनामुक्तांच्या टक्केवारीचा आज निचांक दिसून आला. आज कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी ७९.३५ एवढी आहे. आतापर्यंत २ लाख ११ हजार २३६ जणांनी कोरोनावर मात केली.

सक्रीय रुग्ण ५० हजारांच्या उंबरठ्यावर

सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९ हजार ३४७ सक्रीय रुग्ण आहेत. यात शहरात ३२ हजार ५९७ तर ग्रामीण भागात १६ हजार ७५० रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. एका आठवड्यापूर्वी २ एप्रिलला जिल्ह्यात ४० हजार ८०७ सक्रीय रुग्ण होते. त्यात आठवडाभरात ८ हजार ५४० रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता रुग्णालयात बेड्स मिळणेही कठीण झाले आहे.

शहरातील बाधित दोन लाखांवर

शहरातील एकूण बाधितांची संख्या दोन लाखांवर पोहोचली आहे. शहरात आतापर्यंत २ लाख ३ हजार ६३० नागरिक बाधित झाले. ग्रामीण भागातही गेल्या महिनाभरात बाधितांची संख्या वेगाने वाढल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६१ हजार ५१२ पर्यंत पोहोचली. सातत्याने बाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com