भाजपमध्ये लवकरच फाटाफूट! ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचा पक्षाला राम-राम करण्याचा निर्णय

राजेश चरपे
Friday, 22 January 2021

सध्या भाजपात प्रचंड अस्वस्थता आहे. प्रत्येकाचा स्वतंत्रपणे कारभार सुरू आहे. कोणीच कोणाचे नेतृत्व मान्य करायला तयार नाही.

नागपूर : भाजपमध्ये लवकरच मोठी फाटाफूट होणार असून माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही ज्येष्ठ पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी पक्षाला राम-राम करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका महापालिकेच्या निवडणुकीसोबतच भविष्यात फडणवीस यांनाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - आता हेच बाकी होतं! नागपूर मेट्रोत प्री-वेडींग, वाढदिवस...

सध्या भाजपात प्रचंड अस्वस्थता आहे. प्रत्येकाचा स्वतंत्रपणे कारभार सुरू आहे. कोणीच कोणाचे नेतृत्व मान्य करायला तयार नाही. शहरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी असे उघडपणे गट पडले आहेत. याचा फटका पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी महापौर संदीप जोशी यांना नुकताच बसला आहे. यानंतरही कुणी पुढाकार घ्यायला तयार नाही. पराभवाचे चिंतनही केले जात नसल्याने अनेक निष्ठावंत अधिकच अस्वस्थ झाले आहेत. कोणी विचारत नाही, दखल घेत नाहीत, पद सोडाच पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनही विश्वासात घेतले जात नसल्याने पक्ष सोडण्याच्या निर्णयावर अनेकजण येऊन ठेपले आहेत. या अस्वस्थ गटाचे नेतृत्व करणाऱ्या एका माजी नगरसेवकाची तब्येत सध्या खराब आहे. त्यामुळे निर्णय थोडा लांबणीवर टाकला आहे. मात्र, पक्षाला राम-राम करण्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे एका माजी नगरसेवकाने सांगितले. 

हेही वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

गटबाजीचा फटका भाजपला विधानसभेच्या निवडणुकीतही बसला होता. शहरातील दोन विधानसभा गमावल्या. मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप थोडक्यात बचावली. याची तत्काळ दखल घेऊन मोठे फेरबदल होतील, जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील असे सर्वांना वाटत होते. मात्र, उलटच घडत आहे. 

बेफिकीर वाढली - 
मागील निवडणुकीत तब्बल १०८ सदस्य निवडून आल्याने बेफिकीरपणा वाढला आहे. प्रत्येक प्रभागात भाजपच्या नगरसेवकांविषयी नाराजी वाढली आहे. अनेकांनी निवडून आल्यानंतर प्रभागात जाणेही सोडले आहे. यातच भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी पक्षाच्या बैठकीत नगरसेवकांबाबत नागरिकांमध्ये 'अँटी इन्कबंसी'  वाढत चालली असल्याने निदर्शनास आणून दिले आहे. त्यात मोठे तथ्य आहे. वर्षभरावर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. अशा परिस्थिती आजी-माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यास भाजपची सूज उतरल्याशिवाय राहणार नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur corporator will resigned bjp soon political news