फसवणूक ! संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

काही महिन्यांपूर्वीपर्यंत दोन्ही गुंतवणूकदारांना ठरलेल्या दराने जव्हेरी अँड सन्सकडून दरमहा नियमित व्याजाची रक्कम मिळत होती. परंतु, अचानक हे पैसे देणे बंद करण्यात आले.

नागपूर : सराफा क्षेत्रातील प्रसिद्ध आस्थापना असणाऱ्या त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी फर्मकडून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

हेमंत जवेरी (58) रा. वरळी, मुंबई आणि सागर जव्हेरी (34) रा. टीबीझेड अँड सन्स प्रा. लिमिटेड, मुंबई अशी आरोपींची नावे आहेत. त्रिभुवनदास भीमजी जव्हेरीतर्फे 2012 मध्ये योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार गुंतवणूक करणाऱ्यांना दीड टक्के प्रमाणे व्याजाची रक्कम दरमहा मिळणार होती. या योजनेत सुगतनगर, जरीपटका येथील रहिवासी उत्तंगराव भोजापाई (60) व त्यांचे मित्र प्रशांत कुमार टायटस यांनी गुंतवणूक केली होती.

चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

त्यांनी छावणी येथील त्रिभुवनदास भीमजी जव्हेरीच्या प्रतिष्ठानात जाऊन योजनेसाठी आवश्‍यक सर्व सोपस्कार पार पाडले होते. 5 सप्टेंबर 2012 ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीसाठी त्यांनी गुंतवणूक केली होती. काही महिन्यांपूर्वीपर्यंत दोन्ही गुंतवणूकदारांना ठरलेल्या दराने जव्हेरी अँड सन्सकडून दरमहा नियमित व्याजाची रक्कम मिळत होती. परंतु, अचानक हे पैसे देणे बंद करण्यात आले. यामुळे भोजापाई व टायसन यांनी गुंतविलेले प्रत्येकी 10 लाखाप्रमाणे 20 लाख रुपये परत मागितले.

आरोपींनी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही, पैसेही परत करण्यास टाळाटाळ चालविली होती. त्यामुळे भोजापाई यांनी सदर ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, crime, scam, investor, firm