नागपूरच्या डाॅनने लावली व्यापाऱ्याच्या डोक्‍याला पिस्तूल...मग झाले असे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

संजय यांनी 50 लाख रुपये मागताच संतोष याने संजय यांच्या कानशिलावर पिस्तूल लावून ठार मारण्याची धमकी दिली. फ्लॅट विक्री करणे अचानक जिवावर बेतत असल्याचे पाहून संजय घाबरले आणि लगेच काढता पाय घेत स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पुन्हा संतोष याला पैशाची मागणी केली. तेव्हाही संतोष याने पिस्तूलाचा धाक दाखवून जीवंत राहायचे असेल तर पाच लाख रुपये दे, अशी धमकी दिली.

नागपूर :  कुख्यात झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकरवर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने एका व्यापाऱ्याच्या डोक्‍याला पिस्तूल लावून घराच्या खरेदी-विक्री पत्रावर सही करून घेतली तसेच पाच लाख रूपयांची खंडणीही मागितली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपासासाठी गुन्हेशाखेकडे वर्ग केला आहे. डॉन संतोष आंबेकरवर आतापर्यंत 13 गुन्हे दाखल झाले असून तो सध्या मध्यवर्ती कारागृहात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय नत्थूजी राहाटे (वय 49) हे बजरंगनगर, मानेवाडा रोडवरील आनंद सागर अपार्टमेंटमध्ये कुटूंबासह राहतात. 1 एप्रिल 2015 ला त्यांनी स्वतःचा फ्लॅट विक्रीस काढला होता. त्याच फ्लॅटवर डॉन संतोष आंबेकरची नजर Don aambekar entered one more crime होती. त्यामुळे त्याने आपला साथीदार आरोपी नितेश पुरूषोत्तम माने (वय 38, रा. नवाबपुरा, महाल) याला संजय यांच्याकडे पाठविले. नितेश याच्या माध्यमातून संतोष याने संजय यांच्यासोबत 55 लाख रुपयांमध्ये प्लॉट खरेदीचा व्यवहार केला. तोपर्यंत संतोष आंबेकरचा फ्लॅट खरेदी-विक्रीत कोणताही सहभाग दर्शविण्यात आला नाही.

सविस्तर वाचा - पतीपत्नीने घेतले विष आणि...

संजय यांनाही चांगली रक्‍कम मिळत असल्यामुळे खोलात चौकशी न करता नितेशसोबत फ्लॅटचा सौदा पक्‍का केला. फ्लॅटच्या रजिस्ट्रीदरम्यान नितेश याने पाच लाखांचा धनादेश दिला. उर्वरित रक्कम संतोष याच्या कार्यालयात देतो, असे सांगून नितेश हा संजय यांना घेऊन संतोष याच्या कार्यालयात गेला. संजय यांनी 50 लाख रुपये मागताच संतोष याने संजय यांच्या कानशिलावर पिस्तूल लावून ठार मारण्याची धमकी दिली. फ्लॅट विक्री करणे अचानक जिवावर बेतत असल्याचे पाहून संजय घाबरले आणि लगेच काढता पाय घेत स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पुन्हा संतोष याला पैशाची मागणी केली. तेव्हाही संतोष याने पिस्तूलाचा धाक दाखवून जीवंत राहायचे असेल तर पाच लाख रुपये दे, अशी धमकी दिली. त्यानंतर संजय यांनी संतोषला पैशाची मागणी केली नाही. दरम्यान संतोष व त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हेशाखा पोलिसांनी मकोकांतर्गत कारवाई केल्याने संजय यांना धीर आला. त्यांनी गुन्हेशाखेचे अपर आयुक्‍त नीलेश भरणे आणि पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांची भेट घेतली. घटनेची माहिती देत संतोष व नितेशविरुद्ध तक्रार दिली. संतोष व त्याच्या साथीदाराविरुद्ध खंडणी व शस्त्रप्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कोण आहे नितेश माने !
गुन्हेगारी जगतातील डॉन संतोष आंबेकरच्या टोळीतील कुख्यात गुंड म्हणून नितेश माने याची ओळख आहे. नितेश माने हा बाल्या गावंडे हत्याकांडातील आरोपी असून, या प्रकरणात त्याची निर्दोष सुटका झाली आहे. नितेश याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून कधीकाळी तो संतोष याचा "राईट हॅंड' म्हणून काम करीत होता. संतोष व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हेशाखा पोलिसांनी मोक्‍काअंतर्गतही कारवाई केली आहे.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Don aambekar one more crime