अग्नितांडव! जुनी शुक्रवारीत एकाचा मृत्यू, पाळीव पोपट भस्मसात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

लाकडी पाट्या आणि बासांचा उपयोग असल्याने आग झपाट्याने पसरत गेल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

नागपूर : जुन्या घराला भीषण आग लागून घरमालकाचा मृत्यू झाला. घरात पाळलेला पोपटही या घटनेत भस्मसात झाला. शुक्रवारी मध्यरात्री जुनी शुक्रवारीत घडलेल्या या अग्नितांडवाने परिसरात खळबळ उडाली. आज दुपारपर्यंत आगीची धग कायम होती. त्यामुळे अग्निशमन विभागाचा एक बंब आग विझविण्यासाठी पाठविण्यात आला. 

नवीन बनोदे (39) असे मृताचे नाव आहे. जुनी शुक्रवारीतील भोला गणेश चौकात बनोदे कुटुंबीयांचे विटा-माती आणि कवेलूचे अनेक वर्ष जुने दोन मजली घर आहे. खालच्या भागात जवळपाच दहा दुकांनाची चाळ आहे. समोरच्या भागात नवीन बनोदे व लहान भाऊ प्रवीण बनोदे यांचे कुटुंब वास्तव्यास असून मागच्या भागात सुनील बनोदे आणि लक्ष्मण बनोदे सहकुटुंब राहतात. दुकानांच्या चाळीत नीलेश राजरकर यांचे सलून आणि योगेश बनोदे यांचे हॉटेल आहे. 

अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

शुक्रवारी मध्यरात्री घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना आग लागली. थंडीचे दिवस असले तरी क्षणार्धात आग संपूर्ण घरात पसरत गेली. तीव्र झळांमुळे घरातील मंडळींना जाग आली. आरडाओरड करीत सर्वजण बाहेर पडले. नवीन यांना मात्र बाहेर पडणे शक्‍य झाले नाही. आगीच्या विळख्यात सापडून ते आतच अडकले. आगीचे रौद्र रूप पाहून शेजारी घाबरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. संकीर्ण गल्ली आणि दाटीवाटीने घरे असल्याने आगीवर नियंत्रणासोबतच ती पसरू नये याची काळजी घेणे क्रमप्राप्त होते. यामुळे अतिरिक्त बंब बोलावून घेण्यात आले. एकूण सात गाड्यांच्या मदतीने चारही बाजूने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न करण्यात आले. शर्थीच्या प्रदीर्घ प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. पण, तोपर्यंत नवीन यांचा होरपळून मृत्यू झाला होता. घरात पाळलेला पोपटसुद्धा पूर्णत: जळून गेला होता. आलमारी, फ्रीज, सिलिंडरसह घरातील संपूर्ण साहित्य या घटनेत स्वाहा झाले. 

शॉर्टसर्किटमुळे आग? 
आगीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे हॉटेलपासून आग सुरू झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. लाकडी पाट्या आणि बासांचा उपयोग असल्याने आग झपाट्याने पसरत गेल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. नवीन यांच्या मृत्यूप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, fire, short circuit, death, accident