गोरेवाडा जंगलाला आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

आग कोणी लावली याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अज्ञान व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या डागा टॉवर लागून असलेल्या युनिट क्रमांक एकच्या परिसराला सोमवारी दुपारी आग लागली होती. त्यावर त्वरित नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला यश आल्याने अनर्थ टळला. अंदाजे नऊ हेक्‍टर जंगल जळून खाक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला दुपारी सव्वा वाजता आग लागल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. आग गवताला लागल्याने थोड्याच वेळात आगीचा धूर दुरून दिसत होता. तातडीने प्रशासनाची चमू घटनास्थळी पोचली आणि त्यांनी ब्लोअरच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणली. परंतु, किती हेक्‍टर जंगल जळाले हे मोजण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ हेक्‍टर जंगल जळाले आहे. 

युनिट क्रमांक एकला नियमित आग लागत असल्याने त्या परिसरात संरक्षण वाढविणे अपेक्षित आहे. गेल्या काही दिवसात कामगारांना कामावरून कमी केल्याने जंगलाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. आग कोणी लावली याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अज्ञान व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गोरेवाडा जंगलाला यावर्षीही ही पहिलाच आग असून भविष्यात संरक्षण न वाढविल्यास आगीच्या घटनात वाढ होण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. 

अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, gorewada, fire, forest