लवकरच ट्रॅकवर धावेल नागपूर मेट्रो, अशा असतील प्रवासाच्या अटी

nagpur metro to start soon
nagpur metro to start soon

नागपूर : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवितानाच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी शिथिलताही दिली. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात आपली बस, मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, नागपूरकरांचा प्रवास आता कोरोनापूर्वीच्या काळानुसार नव्हे तर कोरोनाच्या सावटात अनेक अटींसह प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागपूरकरांना जुन्याच आपली बस, मेट्रोमधून प्रवासाचा नवा अनुभव येणार आहे.

मार्च 11 रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शहरातील मेट्रो सेवा, आपली बस बंद करण्यात आली. गेल्या अडीच महिन्यांपासून शहरातील सार्वजनिक वाहतूक बंद आहे. मात्र, लॉकडाऊन चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्याने नागरिक आता कामावर जात आहेत. खाजगी वाहनांचाही वापर होत आहे. केंद्र सरकारने आज लॉकडाऊन पाचची घोषणा केली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळल्यास सर्वच भागात सर्वच सेवा सुरू करण्याचे स्पष्ट केले आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच टप्प्या-टप्प्याने सर्व सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता कोरोना रुग्णांमुळे प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र वगळून इतर भागात सार्वजनिक वाहतूकीचाही मार्ग मोकळा झाला. ही सेवा कधीपासून सुरू करणार? याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा मजूर वर्ग, कामगार, खाजगी कार्यालयातील कर्मचारी बस, मेट्रोची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र आता नागपूरकरांचा प्रवास कोरोनाच्या सावटातच होणार असल्याने प्रवासासाठी अनेक अटींचा सामना करावा लागणार आहे.

बसमध्ये प्रवासासाठी अटी व उपाययोजना

  • - दररोज प्रत्येक बसमधील आसनांची फेरीनंतर स्वच्छता.
  • - प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक
  • - एका आसनावर एकच प्रवासी
  • - बसमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन बंधनकारक.

मेट्रोमधून प्रवासासाठी अटी व उपाययोजना

  • - सोशल डिस्टनिसंगचे पालन करावे लागणार.
  • - मास्कचा वापर करणे बंधनकारक
  • - संपूर्ण मेट्रो ट्रेनचे सॅनिटायझेशन
  • - लिफ्ट, एस्केलेटर्सवर हात ठेवता येणार नाही.
  •  

सार्वजनिक वाहतूक सुरू करण्याचा विचार आहे. मात्र बसची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, आसनावर बसण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यात येत आहेत. बसमध्ये नेमके किती प्रवासी राहतील याबाबतही विचार केला आहे. ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल, परंतु सध्याच वेळापत्रक सांगता येणार नाही.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका.

आपली बसमध्ये अनेक गरीब, मजूर वर्ग प्रवास करतो. आता बांधकाम, खाजगी कार्यालयेही काही प्रमाणात सुरू झाले. येथील कर्मचारी, मजुरांना ये-जा करण्यासाठी आपली बस सुरू करण्याबाबत आयुक्तांना पत्र देणार आहे. प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करून लवकर बससेवा सुरू करावी.
- बाल्या बोरकर, सभापती, परिवहन समिती, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com