मास्क न वापरणे पडले महाग; आतापर्यंत २८ हजार नागरिकांवर कारवाई, सव्वा कोटी वसूल

राजेश प्रायकर
Friday, 22 January 2021

महापालिकेच्या शोध पथकांनी शहरात मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत २८ हजार ३६३ नागरिकांविरुद्ध कारवाई करीत १ कोटी २५ लाख ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नागपूर : शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून महापालिकेने आतापर्यंत सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या काही महिन्यात मनपाच्या उपद्रव शोध पथकांनी २८३६३ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. गुरुवारी बेजबाबदार १५८ नागरिकांविरुद्ध कारवाई करीत प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

महापालिकेच्या शोध पथकांनी शहरात मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत २८ हजार ३६३ नागरिकांविरुद्ध कारवाई करीत १ कोटी २५ लाख ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना विषाणूचा धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरताना दिसत आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथक समाजाचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे. एवढेच नव्हे त्यांना मास्क देण्यात येत आहे.

हेही वाचा - अन् पराभूत उमेदवार झाला विजयी; ३ दिवसांच्या आंनदोत्सवावर विरजण; नक्की काय घडला प्रकार 

गुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत १६, धरमपेठ झोन अंतर्गत ३०, हनुमाननगर झोन अंतर्गत ३३, धंतोली झोन अंतर्गत ४, नेहरूनगर झोन अंतर्गत ९, गांधीबाग झोन अंतर्गत ११, सतरंजीपुरा झोन अंतर्गत ८, लकडगंज झोन अंतर्गत ९, आशीनगर झोन अंतर्गत १५, मंगळवारी झोन अंतर्गत १९ आणि मनपा मुख्यालयातील ४ जणांविरुद्ध कारवाई केली. शहरात रुग्णांची संख्यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहाही झोनमधील मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरुद्ध कारवाई करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur municipal corporation action against 28 thousand people who not having mask