esakal | पौर्णिमेला दिवेबंद; ‘अर्थ डे नेटवर्क’कडून नागपूर मनपाला सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Municipal Corporation Star Municipal Leadership Award

नागपूर महानगरपालिकेने पौर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेल्या उपक्रमाची ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ने दखल घेतल्याने मनपाचा देशात नाव लौकिक झाला आहे.

पौर्णिमेला दिवेबंद; ‘अर्थ डे नेटवर्क’कडून नागपूर मनपाला सन्मान

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर  : पौर्णिमा दिनानिमित्त नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’चा ‘ऊर्जा बचत’ गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार नागपूर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला आहे.

नागपूर महानगरपालिकेने पौर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेल्या उपक्रमाची ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ने दखल घेतल्याने मनपाचा देशात नाव लौकिक झाला आहे. मनपाच्या या यशाबद्दल महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे व महापालिका कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

ठळक बातमी - मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! विदर्भ, अंबा एक्स्प्रेससह तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु
 

नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्यावतीने २०१४ पासून ऊर्जा बचतीच्या दृष्टीने पौर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पौर्णिमेच्या प्रकाशात रात्री अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. त्याला प्रतिसाद देत नागरिकही या विधायक उपक्रमात सहभागी होतात. 

पौर्णिमेच्या रात्री ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे स्वयंसेवक शहरातील विविध भागात फिरून नागरिकांना, व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे रात्री ८ ते ९ या वेळात बंद करण्याचे आवाहन करतात. मनपा आणि ग्रीन व्हिजीलच्या या आवाहनाला शहरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २ लाख ५३ हजार २०१ किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’मधून मनपाच्या पौर्णिमा दिन उपक्रमाचे कौतुक केले आहे.

पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने एक पाऊल
देशातील हिरवे शहर अशी ओळख असलेले आपल्या नागपूर शहराने पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. या यशामागे नागरिकांनी दाखविलेला पुढाकार, समंजसपणा आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे करण्यात येणारी जनजागृतीचीसुद्धा मोठी भूमिका आहे. या यशासह शहरातील नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे.
-संदीप जोशी, महापौर 

संपादन  : अतुल मांगे