50 वर्षांत प्रथमच 131 खाटांवरून 450 खाटांवर, कुणी साधली ही किमया...

केवल जीवनतारे
बुधवार, 24 जून 2020

30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात इंदिरानगरातील आयसोलेशन हॉस्पिटल, पाचपावलीचे महिला व बाळ रुग्णालय आणि गांधीनगरातील इंदिरा गांधी रुग्णालयातील खाटांची एकूण बेरीज 131 आहे. पन्नास वर्षांत एकही खाट वाढविण्याचा प्रयत्न पालिकेतील पुढाऱ्यांनी केला नाही.

नागपूर : उपराजधानीत महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांची दुरवस्था झाली होती. यामुळेच शहरात दोन अद्ययावत रुग्णालये उभारण्याची घोषणा 11 वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी केली होती. मात्र, ही रुग्णालये कागदावरच राहिली. 30 लाख लोकसंख्येच्या शहरात पालिकेच्या केवळ 131 खाटा होत्या. विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे नागपुरात आल्यानंतर इतिहासात प्रथमच महापालिकेची रुग्णालये हायटेक होत आहेत. 131 खाटांवरून 450 खाटांपर्यंत मजल मारता आली. कधी नव्हे ती पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम होण्याच्या दिशेने प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे.

महापालिकेचा आरोग्य विभाग आतापर्यंत हेल्थपोस्ट अन्‌ 'डिस्पेन्सरी'मध्ये बाह्यरुग्ण विभागांत पाच-पंचवीस रुग्णांची तपासणी करून शहराचे आरोग्य सांभाळत असल्याचा देखावा करीत उभा होता. मलेरियाची साथ असो, बर्ड फ्लू असो की, स्वाइन फ्लूचा भडका. शहरातील आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी कधीच पालिकेचा आरोग्य विभाग घेत नव्हता.

अधिक माहितीसाठी - दुर्दैवी ! खेळण्या-बागडण्याच्या वयात केतेश्‍वरीचे जाणे मनाला हूरहूर लावणारे...

30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात इंदिरानगरातील आयसोलेशन हॉस्पिटल, पाचपावलीचे महिला व बाळ रुग्णालय आणि गांधीनगरातील इंदिरा गांधी रुग्णालयातील खाटांची एकूण बेरीज 131 आहे. पन्नास वर्षांत एकही खाट वाढविण्याचा प्रयत्न पालिकेतील पुढाऱ्यांनी केला नाही, तसा विषयदेखील सभेच्या अजेंड्यावर कधी आला नाही. मात्र, दरवर्षी आरोग्याच्या अंदाजपत्रकात वाढ होते. सामान्य जनतेकडून आरोग्य कर वसूल केला जातो. परंतु, एकाही रुग्णालयात मेडिसीन, सर्जरी, बालरोग असो की, विकृतीशास्त्र, बधिरीकरणशास्त्राचे विशेषज्ञ नाहीत.

अशी केली होती घोषणा...

पालिकेचे तत्कालीन आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी शहरात पूर्व आणि पश्‍चिम नागपुरात बीओटी तत्त्वावर दोन अद्ययावत रुग्णालये तयार करण्याचा संकल्प सोडला होता. परंतु, यानंतरच्या महापालिका आयुक्तांनी नवीन रुग्णालयांच्या उभारणीच्या विषयाला हात घातला नाही. हा विषय कधी महापालिकेच्या सभेत गाजला नाही. एकाही रुग्णालयात अद्ययावत असे एक्‍स-रे मशीन नाही, सोनोग्राफीची सोय नाही, सीटी स्कॅन तर नाहीच नाही. एमआरआय यंत्राचा तर विचारच करणे शक्‍य नाही, अशा समस्यांच्या विळख्यात पालिकेची आरोग्यसेवा सापडली आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर केला आहे. मात्र, त्यांच्या इच्छाशक्तीला लोकप्रतिनिधींकडूनच विरोध होत आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे वाजलेले बारा सुधारण्याचे काम मुंढे यांनी सुरू केले. 131 खाटांवरून 450 खाटा करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.

जाणून घ्या - पतीसोबत अश्‍लील वर्तन करण्यास बाध्य केले; नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

इंदिरा गांधी रुग्णालय सुधारले

मेयो आणि मेडिकल कॉलेजच्या भरवशावर उपराजधानीतील गरिबांचे आरोग्य कसेबसे सांभाळले जात आहे. संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी सांभाळावी यासाठी दोन्ही अधिष्ठातांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. आयुक्त बदलत गेले; परंतु मेयो, मेडिकलच्या अधिष्ठातांच्या पत्रांचा आशय आणि विषय हे कागदावर राहिले. विद्यमान महापालिका आयुक्तांनी शहरातील आरोग्यसेवेचा अनुशेष दूर करण्यासाठी पावले उचलली आहेत. महापालिकेचे पाचपावली येथील सूतिकागृह, केटी नगर दवाखाना, इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पिटलनी कात टाकली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur Municipal hospitals are becoming high-tech