घराघरांत साचणार कचऱ्याचे ढिगारे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

महापालिकेने शहरातील घराघरांतून कचरा उचल करण्याचे कंत्राट एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या कंपन्यांना दिले. 16 नोव्हेंबरपासून या कंपन्यांनी कचरा संकलनाला सुरुवात केली.

नागपूर : घराघरांतून कचऱ्याची उचल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन लांबल्याने त्यांनी आज महापालिकेत आयुक्तांकडे दाद मागितली. बीव्हीजी व एजी या दोन्ही कंपन्यांना आयुक्तांना वेतन करण्याचे निर्देश दिले. परंतु, वेतनासंबंधी काही अडचणी पुढे केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी उद्या, शनिवारी शहरातील कचरा न उचलण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे उद्या घराघरांत कचऱ्याचे ढिगारे  आहेत. यानिमित्त दोन्ही कंपन्यांच्या कामकाजाची गाडी रुळावर आली नसल्याचेही स्पष्ट झाले.
 
महापालिकेने शहरातील घराघरांतून कचरा उचल करण्याचे कंत्राट एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या कंपन्यांना दिले. 16 नोव्हेंबरपासून या कंपन्यांनी कचरा संकलनाला सुरुवात केली. मात्र, अद्याप शहरातील अनेक भागांत कचऱ्याची उचल केली जात नसल्याचे नगरसेवकांच्याही तक्रारी आहेत. आता या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनीही महिन्याभराचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने संताप व्यक्त केला. आज या कंपन्यांतील हजारो कर्मचारी महापालिकेत आयुक्तांकडे पोहोचले. भारतीय कामगार सेनेचे बंडू तळवेकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांसोबत चर्चा केली. 

असे का घडले? - प्रेमासाठी वाट्टेल ते, प्रियकराला वाचविण्यासाठी केले असे..

आयुक्तांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचे निर्देश दिले. परंतु, या कंपन्यांनी अडचणी पुढे केल्या. त्यामुळे वेतन होत नाही, तोपर्यंत कचरा उचलणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे बंडू तळवेकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे. वेतन महिन्याच्या सात तारखेपर्यंत करण्यात यावे, आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्याचे तिलक पालेवार, सुभाष डहाट, नीलेश रामटेके, अंकुश धमगाये, भूपेंद्र कठारे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. वेतन होत नाही, तोपर्यंत कचरा उचलणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने उद्या शहरातील प्रत्येक घरात कचऱ्याचे ढिगारे राहतील.

सुरुवातीपासून या दोन्ही कंपन्यांचे कचऱ्याची उचल करण्याबाबत नियोजन फिस्कटले. महिन्याभरातच कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागत असल्याने अजूनही कंपन्यांच्या कामकाजाची गाडी रुळावर आली नसल्याचेही यातून अधोरेखित झाले. 

 

महिन्याभरातच वाद चव्हाट्यावर

 एजी एन्व्हायरो कंपनीकडे एक ते पाच क्रमांकाच्या झोनमधील तर बीव्हीजी कंपनीकडे सहा ते दहा क्रमांकाच्या झोनमधील वस्त्यांची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांना आवश्‍यक सोयीसुविधांसोबत वेतन वेळेवर देणे अपेक्षित आहे. महिन्याभरातच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा वाद चव्हाट्यावर आला. त्यामुळे भविष्यात कचऱ्यावरून नागरिकांची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता बळावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur nmc news about Garbage