झलकेंच्या ‘संकल्पा'ला सभागृहाचे बळ; विरोधकांकडून आकड्यांची फेरफार केल्याचा आरोप 

Nagpur NMC Speaker supports financial bill of nmc
Nagpur NMC Speaker supports financial bill of nmc

नागपूर ः कौतुक व विरोधकांची टिका झालेल्या २७३१ कोटींच्या मनपाच्या अर्थसंकल्पाला सभागृहाने गुरुवारी अखेर मंजुरी दिली. महापौर संदीप जोशी यांनी पाणी कराबाबत वन टाइम सेटलमेंट योजना सुरू करण्याचे तसेच थकीत मालमत्ता करावरील दंड माफ करण्यासंदर्भात योजना सभागृहात मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश आयुक्तांना दिले. 

स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी कोव्हीड काळातही उत्तम अर्थसंकल्प सादर करीत नागपूरकरांना मालमत्ता कर, पाणी कराबाबत दिलासा देण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत नमूद केले. मात्र, विरोधकांनी अर्थसंकल्पात आकड्यांची फेरफार असल्याचा आरोप केला. 

स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी २७३१ कोटींच्या सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील सलग सात तास झालेल्या ऑनलाइन चर्चेत सत्ताधारी, विरोधी पक्षनेते, गटनेते, नगरसेवकांनी विविध सूचनाही केल्या. सूचना करताना विरोधकांनी अर्थसंकल्पावर बोचरी टिका केली. सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी चर्चेदरम्यान पुन्हा तुकाराम मुंढे यांना लक्ष्य केले. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी घाटांवर लाकडे मोफत मिळावी, नगरसेवकांची काही कामे सुटली असल्यास त्याचा अर्थसंकल्पात समावेश करावा, अशी सूचना केली. 

त्याचवेळी त्यांनी अर्थसंकल्पात आकड्यांची फेरफार करण्यात आल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेत्याच्या भाषणानंतर सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी तसेच जुन्याच योजना पुढे सुरू करण्याच्या संकल्पाचे कौतुक केले. त्यांनी नगरसेवकांच्या सूचनांचा समावेश करीत अर्थसंकल्प मंजूर करण्याची मागणी केली. आयुक्तांचा अर्थसंकल्प फेब्रुवारीत येणार असल्याने अधिकाऱ्यांनी विकास कामे तत्काळ सुरू करावी, असे निर्देश प्रशासनाला द्यावे, अशी सूचना केली. 

तत्पूर्वी कॉंग्रेस नगरसेविका दर्शनी धवड यांनी एलईडी लाइट लावण्याचे काम पूर्ण केल्याच्या झलकेंच्या दाव्यातील हवा काढली. धरमपेठ झोनमध्ये १५ महिन्यांपासून एकही एलईडी लाइट लागला नसल्याचे त्या म्हणाल्या. प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी सभागृहाचे विविध प्रस्तावित कामांना मंजुरी देण्याचे स्थायी समितीला देण्यात आलेल्या अधिकाराला विरोध केला. 

बसपाचे जितेंद्र घोडेस्वार, विरंका भिवगडे यांनी उत्तर नागपूरला शहर विकासातून डावलल्याचा आरोप करीत निषेध व्यक्त केला. सत्ताधारी बाकावरील प्रकाश भोयर, नंदा जिचकार, दिव्या धुरडे, विकी कुकरेजा, संजय बंगाले व अनेकांनी झलके यांचे कौतुक केले. दयाशंकर तिवारी यांनी वारंवार वार्ड फंड हा ५० लाख करण्याची मागणी केली जाते. ज्या दिवशी मालमत्ता करातून ८०० कोटींची वसूली होईल तेव्हा आपोआपच वार्ड फंड हवा तेवढा होईल, असे चर्चेदरम्यान नमुद केले. रमण विज्ञान केंद्राप्रमाणे गणित उद्यान करण्यात यावे, अशी सूचना तिवारी यांनी केली. 

आभा पांडे यांची घोटाळ्याची शंका 

अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी जाहिरात विभागाने तीन वर्षांच्या दिलेल्या कंत्राटाला सातत्याने मुदतवाढ दिली जात असल्याचा आरोप करीत घोटाळ्याची शंका व्यक्त केली. एवढेच नव्हे सिवेज वाहून नेणारी ३५ फूट खोल इंग्रजकालीन ट्रंकलाईन दुरुस्तीचे काम आठ दिवसात सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. 

झलकेंनी मागितली माफी 

अर्थसंकल्पात संविधान चौकाऐवजी रिझर्व्ह बॅंक चौक, असे छापून आल्याने ही चूक दुरुस्त करण्यात येईल, असे सांगून सभागृहाची क्षमा मागितली. यावेळी त्यांनी प्रती प्रभाग २० लाख ही चूक दुरुस्त करून प्रती नगरसेवक २० लाख करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आवाजाचा घोळ कायम 

ऑनलाइन सभेत आजही सदस्यांचा आवाजाचा त्रास सहन करावा लागला. ई-गव्हनर्न्स विभागाला आवाजाची समस्या दूर करता आली नसल्याने अनेक सदस्यांनी संताप व्यक्त केला. आवाज ऐकू येत नसल्याने अनेकांनी चर्चेत भाग घेण्याऐवजी मोबाईल बंद करण्याला पसंती दिली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com