nagpur pathwhole
nagpur pathwhole

नदी स्वच्छ झाली मात्र रस्त्यांचे काय? पावसाळ्यात नागपूरकर जाणार खड्ड्यात

नागपूर : शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांची सुरू कामे कोरोनामुळे रखडली असून मजूरही स्वगृही परतल्याने डांबरी रस्त्यांची डागडुजीही अशक्‍यच दिसून येत आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नागपूरकरांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागण्याची शक्‍यता आहे. बांधकामाला आयुक्तांनी परवानगी दिली असली तरी मजुरांची समस्या असल्याने पावसाळ्यापूर्वी कामे उरकणे शक्‍य नसल्याचे एका कंत्राटदाराने नमुद केले.

दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी नद्यांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. यंत्रसामुग्रीच्या बळावर नदी स्वच्छ झाली असली तर शहरातील रस्त्यांच्या समस्येने तोंड वर केले आहे. दरवर्षी सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी केली जातात. परंतु मार्चपासून कोरोना विषाणूने संपूर्ण देशभरात थैमान घातले. नागपूरही त्याला अपवाद नसून आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या तीनशेवर गेली आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महापालिकेने सुरू केलेली सिमेंट रस्त्यांचीही सर्व कामे बंद पडली.

या भागातील रस्त्यांची कामे रखडली...
अनेक सिमेंट रस्त्यांची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने अनेक सिमेंट रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. सिमेंट रस्त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील हनुमाननगर झोनमधील सिद्धेश्‍वर सभागृह ते राजकमल चौक, रिज रोड ते शारदा चौक ते आदर्श मंगल कार्यालयपर्यंत सिमेंट रोडची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. दीक्षाभूमी चौक ते उत्तर अंबाझरी मार्ग, गोकुलपेठ बाजार रोड, कॉफी हाउस चौक (वेस्ट हायकोर्ट रोड) ते रामनगर टेकडी रोड व कॉफी हाउस ते धरमपेठ झेंडा चौक ते गजानन मंदिर ते ट्रॅफिक पार्क या रस्त्यांची कामेही 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार होती.

याशिवाय मेडिकल चौक ते तुकडोजी पुतळा चौक, क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा चौक, तुकडोजी पुतळा चौक ते वंजारीनगर जलकुंभ या रस्ताची कामे एका बाजूने झाली आहे. परंतु तीही अर्धवट आहेत. याशिवाय अंतर्गत वस्त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे रखडली आहेत. आयुक्तांनी बांधकाम सुरू करण्यास कंत्राटदारांना सशर्त परवानगी दिली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेले मजूर स्वगृही परतले किंवा परत जात आहेत.

वाचा  कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के पिक कर्ज 

मजुरांशिवाय रस्त्यांची कुठलीही कामे होणे शक्‍य नाही. याशिवाय पावसाळ्यापूर्वी अनेक डांबरी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणेही कठीण झाले आहे. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वेक्षण, विलगीकरण प्रक्रियेत व्यस्त आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नागपूरकरांना रस्त्यांवर प्रवास करताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com