कुणामुळे नागपूरचे खेळाडू राहणार क्रीडा गुणांपासून वंचित, सविस्तर वाचा

 कुणामुळे नागपूरचे खेळाडू राहणार क्रीडा गुणांपासून वंचित, सविस्तर वाचा

नागपूर : खेळाडूंनी वर्षभर कितीही ढोरमेहनत केली आणि त्यांच्या गुणांची कदर करणारे नसतील, तर त्याचा काहीच फायदा होत नाही. याचे जीवंत उदाहरण शालेय खेळाडू आहेत. शाळा व क्रीडा संघटनांच्या उदासिनतेमुळे यंदाही दहावी व बारावीतील शेकडो युवा खेळाडूंवर हक्‍काच्या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. यासाठी शाळा व क्रीडा संघटना एकमेकांना दोष देत असून, लॉकडाउन आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयालाही कारणीभूत ठरविले जात आहे. 


जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी बजावणाऱ्या दहावी व बारावीतील खेळाडू विद्‌यार्थ्यांना दरवर्षी शिक्षण मंडळातर्फे अनुक्रमे 5, 10, 15 आणि 20 क्रीडा गुण देण्यात येतात. त्यासाठी शाळा व क्रीडा संघटनांना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावे लागतात. कार्यालयातर्फे गुणांचे प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे पाठविले जातात. मात्र जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे वारंवार आवाहनही करूनही केवळ सात संघटनांनीच खेळाडूंचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे. यात नागपूर जिल्हा ऍथलेटिक्‍स संघटनेसह बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्‍स, आट्यापाट्या, फेन्सिंग, मार्शल आर्टस व सेपाक टॅकरॉ असोसिएशनचा समावेश आहे. त्यामुळे वरील संघटनेशी संलग्न खेळाडूंच यंदा क्रीडा गुणांसाठी पात्र ठरणार आहेत. क्रीडा गुणांसाठी एकूण 54 खेळांमधील खेळाडू पात्र आहेत. मात्र बोटावर मोजण्याइतक्‍याच संघटना आपली ड्युटी निभविताना दिसतात. 


प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात अनेक शाळा व संघटना उदासिन दिसून आल्या. लॉकडाउनमुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे प्रस्ताव पाठविण्याची तारीख पुढेही ढकलली होती. मात्र त्याऊपरही शाळा व संघटनांनी यात फारशी रुची दाखविली नाही. त्यांच्या या बेफिकीर वागण्यामुळे अनेक युवा खेळाडूंवर क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. गतवर्षीसुद्‌धा असंख्य खेळाडूंना गुणांचा फटका बसला होता. यासाठी शाळा व संघटना एकमेकांना दोष देताहेत. शिवाय लॉकडाउनमुळेही ही औपचारिकता पूर्ण करण्यात अडचणी आल्याचे काहींनी सांगितले. खेळाडू क्रीडा गुणांसाठी वर्षभर कठोर परिश्रम करतात. त्यांचा तो हक्‍कदेखील आहे. दुर्दैवाने खेळाडूंच्या भावना कुणीही जाणून घेताना दिसत नाही. 


यासंदर्भात नागपूर जिल्हा शारीरिक शिक्षक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष डॉ. पद्‌माकर चारमोडे यांचे म्हणणे जाणून घेतले असता ते म्हणाले, या क्रीडा संघटनांसोबतच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयही (डीएसओ) तितकेच दोषी आहे. संघटनांनी आपापल्या खेळाडूंचा प्रस्ताव पाठविणे अपेक्षित असतो. त्यांचे ते कर्तव्य आहे. दुर्दैवाने ते घडताना दिसत नाही. याबाबतीत "डीएसओ'ही चुकते. त्यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांमार्फत आवाहन न करता थेट संघटनांनाच्याच पदाधिकाऱ्यांनाच मेल किंवा पत्र पाठवून खेळाडूंची यादी मागवायला पाहिजे. दोघांमध्ये योग्य समन्वय राहिला तरच खेळाडूंना त्यांचा हक्‍क मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com