Police are searching for Lady Don Preeti Das
Police are searching for Lady Don Preeti Das

नागपूर पोलिस प्रीती दासला घालताहेत पाठीशी?, अजूनही फरार

नागपूर : "लेडी डॉन' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीती दासचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह तीन पोलिस स्टेशनमधील पथके फिरत आहेत. मात्र, पोलिस पथकाला प्रीती दासने गुंगारा दिला. यासोबतच प्रीतीने वकिलांची फौज उभी करून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धडपड केली. परंतु, गुन्ह्यांचे स्वरूप पाहता न्यायालयानेही प्रीतीचा जामीन नामंजूर केल्याने प्रीतीला आणखी एक झटका बसला आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश तिवारी नावाच्या युवकाला लग्न करण्याचे आमिष दाखवून प्रीती दासने जवळपास 14 लाख रुपयांनी ठगवले. त्याच्या पैशातून फ्लॅट विकत घेतला. मात्र, त्या फ्लॅटवर ती पोलिस अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील बड्या नेत्यांसोबत पार्ट्या करीत असल्यामुळे उमेश त्रस्त झाला होता. मात्र, प्रीती दासने त्याला बलात्कार केल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून तो प्रीतीच्या हातचे बाहुला बनला होता. त्यामुळे तिवारीने पाचपावलीत प्रीतीविरुद्ध तक्रार दिली होती.

त्यानंतर तिने लकडगंज परिसरात राहणाऱ्या पौनीकर नावाच्या युवकाला खंडणी न दिल्यास घरात घुसून "तेरी बीबी को धंदे पर बिठा दूंगी' अशी धमकी दिली होती. त्यामुळे पौनीकरने आत्महत्या केली होती. तसेच वायुसेनेतील अधिकाऱ्याला पत्नीने दिलेल्या तक्रारीत फसवण्याची धमकी देऊन पोलिस निरीक्षक शुभदा संख्ये यांच्या नावावर 25 हजार रुपयांची खंडणी उकळली होती. यासह अनेक पोलिस अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केल्यानंतर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे काम प्रीती करीत होती, अशी चर्चा आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना आतापर्यंत तिला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले आहे, याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.
 

जामिनासाठी प्रीतीची फडफड


प्रीतीवर नुकतेच तीन गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी भंडारा आणि सीताबर्डीतही गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगार प्रीतीने राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांची "सेवा' केली. त्यानंतर तिला काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी हाताशी धरून राजकीय फायदा घेतला. सध्या न्यायालयाने प्रीतीचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे ती काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीने उच्च न्यायालयात जाण्यासाठी फडफड करीत असल्याची चर्चा आहे.
 

तीन ठाण्यांचे पोलिस घेताहेत शोध


पाचपावली, लकडगंज आणि जरीपटका ठाण्यात प्रीतीविरुद्ध तक्रारी दाखल आहेत. प्रीतीच्या गुन्ह्यांची चांगलीच "प्रगती' होत आहे. तीन ठाण्यांचे पोलिस तिचा शोध घेत आहेत. मात्र, ती नागपुरात नेमकी कुठे आहे? याबाबत पोलिस अनभिज्ञ आहेत. तिला अटक करण्यासाठी पोलिस राजकीय नेत्यांची घरे सोडून इतरत्र हातपाय मारत आहेत. तिचा शोध सुरू असल्याची प्रतिक्रिया लकडगंज ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी दिली.
 

प्रीतीवर मोक्‍का लावा


समाजसेवेच्या आड अवैध धंदे करणाऱ्या प्रीती दाससारख्या स्वयंघोषित सेविकेवर मोक्‍का कायद्यांर्तगत कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून करण्यात आली आहे. प्रीती दासने केवळ पोलिस अधिकारीच नव्हे तर राजकीय पदाधिकाऱ्यांनाही काळ्या कृत्यात सहभागी केले आहे. प्रीतीशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारे पोलिस अधिकारीसुद्धा तेवढेच दोषी आहेत. त्यामुळे प्रीतीवर मोक्‍का लावण्याची मागणी मनसेकडून गुन्हे शाखेच्या उपायुक्‍तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com