ब्लूटूथ-मायक्रोफोन वापरून दिली परीक्षा अन् मुन्नाभाई आला टॉपर, एका पेपरसाठी घ्यायचा ४ लाख

nagpur police arrested gang who appeared in exam by fake ID
nagpur police arrested gang who appeared in exam by fake ID

नागपूर : मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्त जसा कानात ब्ल्यूटूथ लावून पेपर सोडवतो आणि परीक्षेत टॉप करतो, तसाच प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. लेखा परीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत एका मुन्नाभाईने कानात ब्ल्यूटूथ लावून परीक्षा दिली. तो मुन्नाभाई टॉप आला आणि पहिल्या क्रमांकावर त्याला नोकरी लागली. परंतु, रुजू होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्याचे बिंग फुटले. त्यामुळे मुन्नाभाईची हायटेक टोळी पकडल्या गेली. डीसीपी नुरूल हसन यांनी या टोळीचा पर्दाफाश केला. औरंगाबादेतील दोन सूत्रधारांना अटक केली.

तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करणारे प्रतापसिंग धोंडीराम दुल्हट (वय २५ ,रा. परदेसीवाडी, बदनापूर, जि.जालना) व पुनमसिंग हरिसिंग सुंदरडे (वय ३४ रा.औरंगाबाद) या दोन सूत्रधारांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांची पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. आयपीएस नुरूल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी २०२० ला शासनातर्फे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या विभागीय सह निबंधक सहकारी संस्थेतर्फे कनिष्ठ लिपिक व उपलेखा परीक्षकासाठी परीक्षा घेण्यात आली. नागपुरात दीक्षाभूमीजवळील डॉ. आंबेडकर विद्यालयात येथे परीक्षा झाली. या परीक्षेला इंद्रजित केशव बोरकर (वय २९ रा. आंबेडकरनगर) हा परीक्षार्थी होता. इंद्रजित याच्या ओळखपत्रावर दुल्हट याने स्वत:चे छायाचित्र लावले. त्याने पेपर सोडविला. पेपर तपासणीदरम्यान इंद्रजित याला २०० पैकी तब्बल १७८ गुण मिळाले. ११ मार्चला मूळ दस्तऐवजासह इंद्रजित याला कार्यालयात मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. इंद्रजित हा कार्यालयात गेला. दस्तऐवजाची पडताळणी केली असता इंद्रजित याने परीक्षेदरम्यान केलेल्या स्वाक्षरीत तफावत आढळली. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता बनावट परीक्षार्थी बसविल्याचे त्याने सांगितले. विभागाचे राजू बिर्ले यांनी बजाजनगर पोलिसांनी तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून इंद्रजित याला अटक केली. 

असे सोडवायचे पेपर - 
प्रतापसिंग कडे एक स्मार्टफोन असून त्यात स्पाय कॅमेरा अ‍ॅप आहे. पेपर देतेवेळी तो अगदी लहानसा इअर फोन कानात घालायचा. मोबाईल फोन टी शर्टच्या आतमधील खिशात ठेवून स्पाय कॅमेरा सुरू करून ठेवायचा. स्पाय कॅमेऱ्‍याच्या मदतीने संपूर्ण प्रश्नपत्रिका बाहेर बसलेल्या पुनमसिंगच्या टॅबवर यायचा. त्यानंतर पुनमसिंग प्रश्नांची उत्तरे प्रतापसिंगला सांगायचा. अशाप्रकारे जवळपास २०० पैकी १७५ पेक्षा जास्त गुण मिळवून देत होते. 

पुण्यातील परीक्षेस जाताना अटक - 
आरोपी प्रतापसिंग दुल्हट हा एका पेपरसाठी चार लाख रूपये विद्यार्थ्यांकडून घेत होता. अशाप्रकारे त्याने अनेकांना शासकीय नोकरी लावून दिल्याचा संशय आहे. तो पुण्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेत कुणाचा तरी पेपर सोडविण्यासाठी जात होता. पेपर सोडविण्यापूर्वीच त्याला बजाजनगर पोलिसांनी अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com