जंगलात झोपून काढावे लागताहेत दिवस... ऐका नागपुरातील पोलिसाची व्यथा

Saturday, 23 May 2020

पोलिस मुख्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. व्हिडिओतून पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबचा पर्दाफाश झाला आहे.

नागपूर : तब्येत खराब असूनही वरिष्ठ अधिकारी सुटी देत नसल्याची कैफियत मांडणारा एक व्हिडिओ नुकताच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आठवडाभरापूर्वी घडलेल्या या घटनेपाठोपाठ आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून सुद्धा नागपूर पोलिस दलातील काळी बाजू पुढे आली आहे.

 

 

पोलिस मुख्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. व्हिडिओतून पोलिस मुख्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबचा पर्दाफाश झाला आहे. सतीश शुक्‍ला असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांची पोलिस मुख्यालयात नेमणूक आहे. सतीश शुक्‍ला गत अडीच महिन्यांपासून क्वॉरंटाइन गार्ड ड्यूटी करीत आहेत. त्यांनी मुख्यालयातील ड्यूटी रायटरला अनेकदा ड्यूटी बदलविण्याची विनंती केली. पण रायटरने ड्यूटी बदलण्यास नकार दिला. त्यामुळे शुक्‍ला अडीच महिन्यांपासून घरी गेलेले नाहीत. ते पोलिस मुख्यालयाजवळील जंगलातच झोपत आहेत. पोलिस मुख्यालयातील युवा पोलिस कर्मचारी सेटिंग करून इच्छुक ठिकाणी ड्यूटी करीत आहेत. मात्र, आपली सेटिंग नसल्याने क्वॉरंटाइन गार्ड ड्यूटीवर लावण्यात येत आहे, असा आरोप व्हायरल व्हिडिओतून केला आहे. 

आजारी रजेवरून लगेच हजर 
डॉ. के. व्यंकटेशम पोलिस आयुक्‍त असताना एक पोलिस अधिकारी पैसे घेऊन ड्यूटी लावत असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला होता. तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांनी या प्रकरणाची गंभीर देखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. प्रकरण शेकणार असल्यामुळे तो अधिकारी थेट आजारी रजेवर गेला होता. मात्र, डॉ. वेंकटेशम यांची बदली होताच तो अधिकारी अगदी दहा दिवसात मुख्यालयात हजर झाला होता, अशी चर्चा आहे. आता पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. 

तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून व्हिडिओ व्हायरल करीत सुटीसाठी मुख्यालयातील आरपीआय रामानंद सिंग हे त्रस्त करीत असल्याची तक्रार मांडणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी यशोदा हिची सुटी मंजूर झाली आहे. तिच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिला कर्मचाऱ्यानेही सिंग यांच्यावर आरोप लावला होता. आता पोलिस आयुक्‍त यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. 

कोरोनावर खरेच सापडले औषध?त्याच्या दाव्याला पंतप्रधान कार्यालयाच्या उत्तराची प्रतीक्षा

 

पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत चौकशी करण्यात येत आहे. चौकशीअंती यावर निर्णय घेतला जाईल. 
- डॉ. बी. के. उपाध्याय, पोलिस आयुक्‍त. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur police constable video got viral