कोरोनावर खरेच सापडले औषध?त्याच्या दाव्याला पंतप्रधान कार्यालयाच्या उत्तराची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

गडचिरोलीच्या एका आंतरराष्ट्रीय योगपटूने मात्र कोरोनावर औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्यांनी त्यांचे संशोधन थेट पंतप्रधान कार्यालयाला ई-मेलद्वारे पाठविले आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून काय उत्तर येते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

गडचिरोली : संपूर्ण जग कोरोना विषाणूंच्या (कोविड 19)संसर्गाने भयभीत झाले आहे आणि अजूनही जगात त्यावर औषध उपलब्ध नाही.  गडचिरोलीच्या एका आंतरराष्ट्रीय योगपटूने मात्र कोरोनावर औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्यांनी त्यांचे संशोधन थेट पंतप्रधान कार्यालयाला ई-मेलद्वारे पाठविले आहे. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून काय उत्तर येते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
अनिल निकोडे असे या योगशिक्षकाचे नाव असून ते गडचिरोली शहरातील नामांकित प्लॅटिनम ज्युबिली शाळेत कार्यरत आहेत. निकोडे हे आंतरराष्ट्रीय योगपटू असून नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संघटनेचे( आयएनओ) सदस्यही आहेत.  निकोडे यांनी देशी कापूर, थंडाई व ओव्याचे फूल या वस्तूंचा वापर औषधात केला आहे. त्यांनी तिन्ही पदार्थ एका काचेच्या बाटलीत समप्रमाणात एकत्र केले. त्यामध्ये काहीही न घालता त्या पदार्थांचे द्रवरूप तयार होते. या द्रवाचे फक्त दोन थेंब एक किंवा अर्धा ग्लास कोमट पाण्यात उपाशीपोटी प्राशन करायचे. लहान मुले व वृद्ध यांनी केवळ 1 थेंब औषध घ्यायचे आहे. तीन दिवस हे औषध प्राशन केल्यास प्रभाव जाणवतो. "अमृत रस' असे संबोधल्या जाणाऱ्या या औषधामुळे 103 प्रकारचे संसर्गजन्य रोग नाहीसे होतात, असा संदर्भ आयुर्वेदाचार्य राजयोगी हिराजी महाराज यांच्या पुस्तकात पाहायला मिळतो, असे अनिल निकोडे यांचे म्हणणे आहे. हे औषध डोळ्यांपासून दूर ठेवायचे आहे, लहान मुलांच्या हातात ते द्यायचे नाही व फक्त पाण्यात थेंब टाकूनच ते प्राशन करायचे आहे, असे निकोडे यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात अनिल निकोडे यांनी औषधाचा नमुना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची विनंती करणारा अर्ज व औषध 11 मे रोजी गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहे. त्यानंतर थेट पंतप्रधान कार्यालयालाही ई-मेलद्वारे औषधाची माहिती देणारे पत्र पाठविले आहे. तेथून अद्याप उत्तर मिळाले नाही. मात्र, गडचिरोलीच्या व्यक्तीने कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर शोधून काढलेले औषध प्रयोगशाळा तपासणीत उत्तीर्ण झाल्यास ती गडचिरोली जिल्हा आणि समस्त देशवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरेल. त्यासाठी संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन निकोडे यांच्या प्रयत्नांना किती प्रतिसाद देते, यावर बरेच काही अवलंबून आहे.

सविस्तर वाचा - सावली सोडणार तुमची साथ
संख्या वाढल्याने खबरदारी...
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. मात्र, चौथ्या टप्प्यात अचानक बाहेरून आलेल्या प्रवाशांनी प्रशासनाची झोप उडविली आहे. तीन दिवसांत हा आकडा नऊवर पोहोचल्यानंतर आजवर गाफील असणाऱ्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत असून खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन व पोलिस विभागाकडून सतर्कता बाळगली जात असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Found corona medicine?