झुंड'च्या महानायकाची अहिंसा पदयात्रा, नागपूर ते सेवाग्रामदरम्यान "कदमताल',

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

यात्रेच्या प्रवासादरम्यान प्रा. बारसे हे युवक व गांधीवादी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बुधवारी सायंकाळी पाचला पवनार आश्रम विश्‍वशांती स्तुपाला भेट दिल्यानंतर सेवाग्राम येथील बापुकुटीत पदयात्रेचा समारोप होईल.

नागपूर : गांधीजींच्या पुण्यतिथीला दिल्ली येथील जामिया आणि शाहिनबाग येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि देशात शांतता व बंधुभाव कायम राहावा, यासाठी गांधी विचारांचे अनुयायी व "झुंड' चित्रपटाचे खरे महानायक प्रा. विजय बारसे हे येत्या 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान नागपूर ते सेवाग्रामपर्यंत अहिंसा पदयात्रा काढणार आहेत. पदयात्रा व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरू होणार असल्याची माहिती, प्रा. बारसे यांनी दिली.

 सविस्तर वाचा - एकतर्फी प्रेमातून युवतीला जाळण्याचा प्रयत्न, वाचा आणि डोळ्यांना गंभीर दुखापत, युवती कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवर

"स्लम सॉकर'च्या माध्यमातून झोपडपट्‌टीतील गुन्हेगागी प्रवृत्तीच्या असंख्य गोरगरीब मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पोहोचविणारे
प्रा. बारसे नेहमीच सामाजिक कार्यांमध्ये अग्रेसर राहतात. खेळाडूंना व्यासपीठ देणे असोत किंवा शहरातील मैदाने वाचविण्यासाठी आंदोलन असो. प्रत्येक गोष्टीत ते स्वत:हून पुढाकार घेतात. सध्या एनआरसी व सीएएविरोधात देशभर चर्चा सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आणखी एक सामाजिक बांधिलकी जपणारे पाऊल टाकले आहे. शांततेचा भंग करणाऱ्या दिल्ली येथील घटनांनी ते कमालीचे व्यथीत झाले आहे. जामिया आणि शाहिनबाग येथील संघटनेवर त्यांनी तीव्र नाराजी व चिंता व्यक्‍त केली. ते म्हणाले, या घटनांमुळे देशात सध्या अशांतता व असहिष्णूतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी जामिया येथे आणि शाहिनबागमध्ये गोळीबारांच्या घटना होणे, ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. या दोन्ही घटनांमागे फार मोठे षडयंत्र असून, त्यामुळे माझ्यासह गांधी विचारसरणींचे अनेक लोक व्यथित झाले आहेत. गांधीजींच्या मारेकऱ्यांचे पिलावळ अजूनही जीवंत असल्याचे, या घटनांवरून दिसून येते. कोणत्याही गोष्टीचा विरोध करण्यासाठी हिंसेचा नव्हे, तर शांततेचाच मार्ग अवलंबिला पाहिजे. त्यामुळेच मी नागपूर ते सेवाग्राम पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. देशात शांतता व बंधुभाव कायम राहावा, हा या पदयात्रेमागचा मुख्य उद्‌देश आहे.
संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर व्हेरायटी चौकातील गांधी पुतळ्यापासून प्रा. बारसे यांच्या नेतृत्त्वात सकाळी नऊ वाजता ही पदयात्रा दररोज 30 किमी पायी चालल्यानंतर पहिल्या दिवशी बुटीबोरी येथे आणि दुसऱ्या दिवशी सेलू येथे मुक्‍काम राहणार आहे. यात्रेच्या प्रवासादरम्यान प्रा. बारसे हे युवक व गांधीवादी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बुधवारी सायंकाळी पाचला पवनार आश्रम विश्‍वशांती स्तुपाला भेट दिल्यानंतर सेवाग्राम येथील बापुकुटीत पदयात्रेचा समारोप होईल. या पदयात्रेत यशवंत तेलंग, प्रदीप पवार, हरीश मोहिते, हेमंत थोरात, अशफाकभाई, प्रसन्न खरात, होमकांत सुरंदसे यांच्यासह संविधानप्रेमी, साहित्यिक, प्राध्यापक, समाजसेवक, खेळाडू व गांधीजींचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur to Sevagram Ahinsa walk by Prof. Barase