समीरने लावली अंकुशच्या गळ्यावर तलवार, नंतर घडला हा थरार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

मंगळवारी सकाळी त्यांनी दारु प्यायली. समीर याचा शोध सुरू केला. रात्री वनदेवीनगर भागात समीर हा त्यांना आढळला. सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी समीर हा आर. के. सावजी भोजनालयात घुसला. भोजनालयातच सहा जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून समीर याला ठार केले व पसार झाले.

नागपूर : यशोधरानगरातील एका टोळीने गुन्हेगार समीर उर्फ बाबू शेख रमजान शेख (वय 23, रा. इंदिरामाता नगर) याचा आरके सावजी भोजनालयात खून केला होता. या हत्याकांडात यशोधरानगर पोलिसांनी बारा तासाच्या आत सहा आरोपींना अटक केली.

मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आणि त्याची परिसरात असलेली दहशत संपविण्यासाठी हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. विजय नरेश पडोळे (वय 23) (वय 19, रा. पोळा मैदान), अजय सूरज चव्हाण (वय 22,रा. यादवनगर), आर्यन ऊर्फ गौरव मोहनलाल गुप्ता (वय 20,रा. प्रेमनगर), अंकुश उत्तम सूर्यवंशी (वय 21,रा.कांजी हाऊस चौक), प्रदीप ऊर्फ बंटी यादवराव कनपटे (वय 19,रा.कांजीहाऊस) व महेश ऊर्फ सोनू राजकुमार कुसेरे (वय 25, रा. बारनल चौक),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वाचा - कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलीसांचा उरला नाही धाक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2017 मध्ये समीर व त्याचा साथीदार फरदीन खान मुजीब खान ऊर्फ शेर खान या दोघांनी कुख्यात प्रवीण ऊर्फ प्रकाश लांजेवार (वय 22) याची हत्या केली होती. त्यामुळे प्रवीण याचे साथीदार संतापले होते. या प्रकरणात समीर व त्याचा साथीदार निर्दोष सुटले. खून प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर समीर हा परिसरात दादागिरी करायला लागला. रविवारी त्याने दुकानात घुसून अंकुश याच्या गळ्याला तलवार लावून ठार मारण्याची धमकी दिली होती.

 

त्यानंतर समीर याने विजय पडोळे याच्या घरावर हल्ला केला होता. यामुळे अंकुश व विजय संतापले. दोघांनी अन्य चार साथीदारांच्या मदतीने समीर याचा खात्मा करण्याचा कट आखला. मंगळवारी सकाळी त्यांनी दारु प्यायली. समीर याचा शोध सुरू केला. रात्री वनदेवीनगर भागात समीर हा त्यांना आढळला. सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी समीर हा आर. के. सावजी भोजनालयात घुसला. भोजनालयातच सहा जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून समीर याला ठार केले व पसार झाले.

याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक एस.साखरे, गुन्हे निरीक्षक एन.एन.मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदारे, पाटील, उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद सोलव, प्रकाश काळे, दीपक धानोरकर, नरेश, गजानन, नीलेश यांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मारेकरी निष्पन्न होताच यशोधरानगर पोलिसांनी चौघांना तर पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या नेतृत्वात पाचपावली पोलिसांनी बंटी व महेश या दोघांना अटक केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur talwar attack news