वाहतूक नियम तोडणाऱ्यांमध्ये नागपूरकर अव्वल; दंडाची कोटीच्या कोटी उड्डाणे

अनिल कांबळे  
Wednesday, 23 September 2020

ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. चौकाचौकांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही वाहतूक सिग्नल्स तोडणाऱ्यांवर ई-चलान कारवाईचा दणका सुरू ठेवला आहे.

नागपूर : राज्यात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांमध्ये नागपूरकरांचा अव्वल क्रमांक आहे. शहर वाहतूक पोलिस चालान कारवाई करण्यात आणि दंड ठोठावण्यात नंबर वन आहेत. पोलिसांनी गेल्या दहा महिन्यांत ४ लाख १३ हजारांपेक्षा जास्त वाहनचालकांवर कारवाई केली असून, तब्बल ६ कोटी १८ लाखांचा घसघशीत दंड वसूल केला आहे.

ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. चौकाचौकांत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही वाहतूक सिग्नल्स तोडणाऱ्यांवर ई-चलान कारवाईचा दणका सुरू ठेवला आहे. वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंत ४ लाख १३ हजार ८५८ वाहनचालकांवर कारवाई करीत ६ कोटी १८ लाख २१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. या कारवाईमध्ये १ लाख १० हजार ९८२ दुचाकीचालकांवर हेल्मेट न घातल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून साडेपाच लाखांपेक्षा जास्त दंडाची रक्‍कम पोलिसांनी वसूल केली आहे, हे विशेष.

सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन
 

मोबाईलने दिला फटका

वाहन चालवताना कानाला मोबाईल लावून बोलण्याची अनेकांनी सवय आहे. त्यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. वाहतूक पोलिसांनी २० हजार ३०० चालकांना वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना पकडले आहे. अपघातास आळा बसावा म्हणून पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांकडून जबरदस्त दंडही वसूल केला आहे.

विना परवाना ‘३३ हजारी’

शहरात ३५ टक्‍के वाहन चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. अशा वाहनचालकांना पोलिसांचा चांगलाच फटका बसला आहे. ३३ हजार ४९२ चालकांकडे परवाना नसल्यामुळे पोलिसांनी दंड ठोठावला. तर १५ हजार ४९८ चालकांवर सिग्नल तोडल्याप्रकरणी चालान कारवाई करण्यात आली. तर १४ हजार ९९२ जणांना ट्रिपल सीट वाहन चालविताना पकडण्यात आले.

नियम पाळा, कारवाई टाळा
शहरातील वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चालान कारवाई धडाक्यात सुरू आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करीत आहेत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे आणि दंडात्मक कारवाई टाळावी.
-विक्रम साळी. पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा) 

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur traffic police take action against those who break the rules