सोमवारपासून प्रशासनाची पुन्हा परीक्षा,  शुक्रवारी  कोरोनाने २८ दगावले

राजेश प्रायकर
Friday, 2 October 2020

मागील आठवड्यात चार दिवस कोरोना चाचण्यांच्या संख्येत घट झाली होती. त्यामुळे बाधितांची संख्या कमी दिसून आली. मात्र, आज ५९४५ जणांचे नमुने तपासण्यात आले. यांपैकी ९२५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

नागपूर  : शहरात गेल्या काही दिवसांत बाधित आणि बळींच्या दैनिक संख्येत घट होत आहे. मात्र, शुक्रवारी आढळून आलेल्या ९२५ बाधितांसह जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ८० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. उपचार घेत असलेल्या २८ जणांचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यातच सोमवारपासून बार, उपहारगृहे सुरू होणार असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

मागील आठवड्यात चार दिवस कोरोना चाचण्यांच्या संख्येत घट झाली होती. त्यामुळे बाधितांची संख्या कमी दिसून आली. मात्र, आज ५९४५ जणांचे नमुने तपासण्यात आले. यांपैकी ९२५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. यात शहरातील ६३१ तर ग्रामीणमधील २९३ जणांचा समावेश आहे. 

बाधा झालेल्यांची टक्केवारी २० पेक्षाही कमी असल्याने दिलासादायक चित्र दिसून येत आहे. मात्र, जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ७९ हजार ९६८ पर्यंत पोहोचली. यात शहरातील ६३ हजार ३०५ तर ग्रामीणमधील १६ हजार २३२ जणांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील ४३१ जणांचेही नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. शुक्रवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २८ जणांचा कोरोनाने बळी घेतला.

हेही वाचा - भरचौकात हत्या झालेल्या गुंडाच्या अंत्यसंस्काराला उसळली हजारोंची गर्दी; नागपुरात गॅंगवॉर भडकण्याची शक्यता
 

यात शहरातील २२ तर ग्रामीणमधील पाच जणांनी शेवटचा श्वास घेतला. एक कोरोनाबळी जिल्ह्याबाहेरचा आहे. २८ बळींसह एकूण बळींची संख्या २ हजार ५७४ पर्यंत पोहोचली. शहरातील १८७६ जणांचा तर ग्रामीणमधील ४४९ जणांचा कोरोनाने बळी गेला. जिल्ह्याबाहेरील २४९ जणांचा शहरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरटीपीसीआर चाचणीवर भर

शहरात आता ॲन्टिजिन चाचण्यात हात आखडता घेण्यात आला तर आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने फिरते चाचणी केंद्रही तयार केले. आज करण्यात आलेल्या ५ हजार ५४ चाचण्यांपैकी ३ हजार ५३२ आरटीपीसीआर चाचण्या आहेत तर २ हजार ४१३ ॲटिजिन चाचण्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ८८४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.

६५ हजार बाधितांनी घेतला मोकळा श्वास

जिल्ह्यात आज १५५३ बाधितांनी कोरोनावर मात केली. यात १ हजार १८८ शहरातील असून ३२५ ग्रामीणमधील आहेत. एकूण ६५ हजार १७७ जणांनी कोरोनावर मात करीत मोकळा श्वास घेतला. सद्यस्थितीत ग्रामीणमधील ३ हजार ४५० तर शहरातील ८ हजार ७६७, असे एकूण १२ हजार २१७ जण उपचार घेत आहेत. यातील ७ हजार ९८१ जण घरीच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagpur, twenty eight people died due to corona on Friday