विद्यापीठाचे आभासी जग! जी परीक्षा झालीच नाही तिचा लावला निकाल; काही विद्यार्थी पास तर काही नापास

मंगेश गोमासे
Sunday, 15 November 2020

या निर्णयानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. ऑनलाईन पध्दतीने शिकवणीला सुरुवातही करण्यात आली. ज्या सत्रातून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. त्याची परीक्षाही नागपूर विद्यापीठाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे बंधनकारक होते.

नागपूर : राज्यात कोरोनाची स्थिती बघता अंतिम वर्ष वगळता इतर सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सर्वच विद्यार्थीना पास करणे गरजेचे होते. परंतु, जी परीक्षा झालीच नाही तिचा निकाल लावल्याचा प्रताप नागपूर विद्यापीठाने केला आहे. येवढेच नाही तर या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना पास तर काही विद्यार्थ्यांना नापास केल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप करावा लागतो आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. सर्व बंद असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणेही अवघड असल्याने परीक्षा घेऊच नये म्हणून राज्य सरकारने निर्णय घेताला. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या शिवाय विद्यार्थ्यांना पास करणे अयोग्य असल्याचे कारण देत युजीसीने अंतिम वर्षाची परीक्षा घेणे बंधन कारक असल्याचे सांगितले. त्यानुसार राज्य शासनाने विद्यापीठाच्या कुलगुरूंशी बोलून अंतिम वर्ष वगळता इतर सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला़.

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

या निर्णयानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. ऑनलाईन पध्दतीने शिकवणीला सुरुवातही करण्यात आली. ज्या सत्रातून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. त्याची परीक्षाही नागपूर विद्यापीठाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे बंधनकारक होते.

मात्र, ज्या सत्राची परीक्षाच घेण्यात आली नाही. तिचा चक्क नागपूर विद्यापीठाने निकाल घोषीत केला. एवढेच नव्हे तर या निकालात काही विद्यार्थ्यांना चागल्या गुणाने पास केले व काही विद्यार्थ्यांना नापास केले. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिकवणी व महाविद्यालयाकडून जे करावयास सांगितले ते सर्व केले अशा विद्यार्थ्यांचाही या नापास विद्यार्थ्यांमध्ये समावेश करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप करण्याची वेळ आली आहे.

अधिक वाचा - छंद म्हणून जुळ्या बहिणी करायच्या बेकरी प्रॉडक्ट्स तयार; आयुष्याने यु-टर्न घेतल्याने झाली व्यवसायाला सुरुवात

अन्यथा विद्यापीठासमोर आंदोलन करू

याबाबत काही विद्यार्थ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विद्यापीठाने कुठलीही परीक्षा न घेताच निकाल जाहीर केला आहे. त्यात काही विद्यार्थ्यांना पास तर काही विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. विद्यापीठाने एकतर सर्वांनाच पास करावयास हवे होते किंवा सर्वांनाच नापास. परंतु, त्यांनी तसे न करता विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला आहे. विद्यापीठाने आम्हाला नापास व इतरांना पास कुठल्या निकशावरून केले ते सांगावे, अन्यथा आम्ही विद्यापीठासमोर जोपर्यंत पास करून देण्याचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन करू इशारा दिला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University failed students without taking exams