केव्हा मिळणार नागपूर विद्यापीठाला कुलगुरू? प्रक्रिया लांबण्याची ही आहेत कारणे... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

19 मार्चला जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत पात्र व्यक्तींना अर्ज सादर करावयाचे होते. कुलगुरुपदासाठी अर्ज करताना ना-हरकत प्रमाणपत्र संबंधित विभाग वा महाविद्यालयातून मिळवावे लागत असल्याने टाळेबंदीत ते मिळणे अशक्‍य असल्याची बाब समोर आली होती.

नागपूर : कोरोनामुळे देशभरात टाळेबंदी लावण्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवार प्राध्यापकांना ई-मेलवर अर्ज पाठविण्यास सांगण्यात आले. याशिवाय टाळेबंदी हटल्यावर अर्जाची "हार्डकॉपी' सादर करण्यासाठी मुभा देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यात सध्यातरी टाळेबंदी हटण्याची चिन्हे नसल्याने हार्डकॉपी मिळण्यास उशीर होत असल्याने विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया लांबणार आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला नवा कुलगुरू मिळावा, यासाठी 19 मार्चला जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीनुसार 20 एप्रिलपर्यंत पात्र व्यक्तींना अर्ज सादर करावयाचे होते. कुलगुरुपदासाठी अर्ज करताना ना-हरकत प्रमाणपत्र संबंधित विभाग वा महाविद्यालयातून मिळवावे लागत असल्याने टाळेबंदीत ते मिळणे अशक्‍य असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे प्रक्रियेतील नोडल अधिकारी प्रो. प्रेमकुमार यांनी टाळेबंदीनंतर अर्जाची हार्डकॉपी सादर करण्याची मुभा देण्याचे ठरविले.

20 एप्रिल शेवटच्या तारीखेनंतर ई-मेलच्या माध्यमातून 131 उमेदवारांनी अर्ज आणि बायोडाटा पाठविला. त्यात विद्यापीठातील कुलगुरूसह माजी कुलगुरू व दिग्गजांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केल्याचे समजते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. विनायक देशपांडे, डॉ. के. सी. देशमुख, डॉ. राजू मानकर, डॉ. जी. एस. खडेकर, डॉ. कुंडल, डॉ. ज्योत्स्ना मेश्राम, डॉ. अनंत देशमुख यांच्यासारख्या नावांचा समावेश आहे.

अर्ज सादर केल्यावर समितीची बैठक घेण्यात येईल. यानंतर अर्जांची छाननी करण्यात येऊन पात्र 20 किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना बोलाविण्यात येईल. गेल्या वेळी जवळपास 132 हून अधिक अर्ज आले होते, हे विशेष. 
 
हेही वाचा : भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले... आदिवासी युवकाची करुण कथा

लवकरच होणार बैठक 
विद्यापीठाचे कुलगुरुपद सात एप्रिलला रिक्त झाले. त्यापूर्वी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, त्याला बराच उशीर झाला. त्यानंतर आता कोरोना असल्याने उमेदवारांकडून अर्जाची हार्डकॉपी पाठविली नसल्याने अद्याप अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत टाळेबंदी उठत नाही, तोपर्यंत उमेदवारांच्या हार्डकॉपी मिळणे अशक्‍य आहे.

त्यामुळे यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कुलगुरुपदाच्या निवड समितीची बैठक लवकरच घेण्यात येईल, असे समजते. समितीच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त जस्टिस दिलीप भोसल, सदस्य सचिव म्हणून पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांची तर विद्यापीठाच्या संयुक्त समितीद्वारे कानपूर आयआयटीचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur university waiting for vice Chanceller