नागपूर विद्यापीठ सुरू करणार लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम; वर्ग, नोट्स, परीक्षा सर्वकाही एकाच प्लॅटफॉर्मवर

मंगेश गोमासे
Monday, 28 September 2020

विद्यार्थी खरोखरच वर्गात हजर असतात किंवा नाही याची माहितीही विद्यापीठाला मिळत नाही. यामुळे विद्यापीठाने 'लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : कोरोनामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिक्षणास सुरुवात झाली आहे. या शिक्षणपद्धतीत एक पाऊल पुढे जाऊन आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 'लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम' तयार करीत आहे. या माध्यमातून विद्यापीठ विभाग, संचालित महाविद्यालये आणि त्यातील विद्यार्थ्यांची हजेरी आणि त्यांच्या वर्गांचे आयोजन करता येणे शक्य होणार आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून महाविद्यालयातील शिक्षण थांबले होते. गेल्या दीड महिन्यापासून विद्यापीठाचे शिक्षण सुरू झाले आहे. यामध्ये विभाग आणि संचालित महाविद्यालयांचे प्राध्यापक स्वतःच्या मोबाईल आणि लॅपटॉप वरून गूगल मिट आणि विविध अ‌ॅपचा उपयोग करताना दिसून येत आहेत. मात्र, यादरम्यान विद्यापीठाचे एक स्वतंत्र प्लॅटफॉर्म असावे, ज्याद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेऊ शकतील. मात्र, विद्यापीठाकडे अशी कुठलीही यंत्रणा नव्हती. शिवाय विद्यार्थी खरोखरच वर्गात हजर असतात किंवा नाही याची माहितीही विद्यापीठाला मिळत नाही. यामुळे विद्यापीठाने 'लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - निराधारांना तीन महिन्यांपासून सरकारचा आधारच नाही, लाभार्थी झिजवताहेत बँकेच्या पायऱ्या

या सिस्टिममध्ये 'व्हर्चुअल क्लासरुम' तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षकांना शिकविण्याची सोय, परीक्षा, नोट्स आणि हजेरीही घेता येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे इतर अ‌ॅपप्रमाणे या सिस्टिमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांशी संवाद साधता येईल आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तरही देता येईल. लवकरच ही यंत्रणा विद्यापीठ कार्यान्वित करण्यात येणार आहे.

हेही वाचा - ‘पेंच’चा महापूर नैसर्गिक की कृत्रिम? गावकरी व...

प्र-कुलगुरू असतानाच या सिस्टीमवर विचार सुरू केला होता. तसेच ती सुरू करण्यासाठी कामही सुरू केले. आता लवकरच ही सिस्टीम सुरू करण्यावर विद्यापीठाचा भर राहील, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले.

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur university will launch learning management system