‘पेंच’चा महापूर नैसर्गिक की कृत्रिम? गावकरी व अधिकाऱ्यांत उफाळला वाद…

रुपेश खंडारे
Monday, 28 September 2020

पण हा पूर नैसर्गिक होता की कृत्रिम, यावरून सद्या वाद सुरू झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. पत्रकारपरिषदेतून हा वाद अधिकच गडद होऊ लागला.खरे काय नी खोटे काय, कुणास ठाऊक !अभियंत्यांनी मात्र या आरोपांना नकार दिला असून हा पूर कुणामुळे आला, या पुराला जबाबदार कोण, असा प्रश्‍न निर्माण मात्र शिल्लक राहिलाच आहे.

पारशिवनी (जि.नागपूर) : मागील महिन्यात पेंच नदीला महापूर आला. अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून गेला. हजारो हेक्टरमधील शेतपिकांचे नुकसान केले. अनेकांची घरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. शेतकरी पुरता उद्वस्त झाला. पण हा पूर नैसर्गिक होता की कृत्रिम, यावरून सद्या वाद सुरू झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. पत्रकारपरिषदेतून हा वाद अधिकच गडद होऊ लागला.
खरे काय नी खोटे काय, कुणास ठाऊक !अभियंत्यांनी मात्र या आरोपांना नकार दिला असून हा पूर कुणामुळे आला, या पुराला जबाबदार कोण, असा प्रश्‍न निर्माण मात्र शिल्लक राहिलाच आहे.
 
अधिक वाचाः  सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण

ग्रामस्थ विचारतात, कशाचा विक्रम मोडला?  
अधिकाऱ्यांनी धरणात आधी क्षमतेपेक्षा अधिक जलसाठा होऊ दिला. जेव्हा धरणाची पाण्याची क्षमता ३२५ मीटर असताना धरणात ८५टक्के, ३२३ मीटर पाणी ठेवणे गरजेचे होते. तरीही पेंच धरणात शंभर टक्के जलसाठा धरणात होऊ दिला. त्याहीपेक्षा पेंच धरणाची पाण्याची क्षमता ३२३ मिटर असतानादेखिल धरणात २९ ऑगस्टला ३२३.२० मिटर पाणीसाठा जमा होऊ दिले. धरणाला धोका निर्माण झाल्याने कुठलाही विचार न करता धरणाचे १६ दरवाजे एकाच वेळी सहा मिटरने उघडले. त्यामुळे पेंच नदीला महापूर आला, या महापुराला अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी पत्रकारपरिषदेत केली.

हेही वाचाः विद्यार्थ्यांची चिंता मिटली, एमएचटी-सीईटी परीक्षेला जाण्यासाठी आता विशेष एसटी बसेसची व्यवस्था

रात्र काढली जागून
पारशिवनी तालुक्यात२९ ऑगस्टला ५० मीमी पाउस पडला होता. पूरस्थिती नसताना पेंच नदीला कृत्रिम महापूर आणून अभियंत्यांनी सहा मीटर धरणाची दारे उघडी करुन पाणी पेंच नदीला सोडले. १९९४ साली पेंच नदीला आलेल्या महापुराचा विक्रम मोडल्याचा पराक्रम केल्याचे  मोबाईलवर पोस्ट टाकून दर्शविण्यात आले. त्यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले होते. या महापुरात नदीकाठावरील अनेक गावे पाण्यात बुडाली होती. जीवितहानी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तर या महापुरात हजारो एकर शेती, घरे, जनावरे पाण्यात वाहून गेलीत. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेठले होते. नागरिकांनी रात्र जागून काढली. सालई माहुली पुलाला या महापुरात जलसमाधी मिळाली. पुल पाण्यात वाहून गेला असल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला, तो वेगळाच.

अधिक वाचाः आरोग्यपथके पोहोचली गाव, पाडे, तांडे, वस्त्यात...

गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी
चौराही धरणातून तोतलाडोह धरणात पाणी सोडण्यात येत आहे. याबाबत आधीच आठ तासापूर्वी माहीती देण्यात आली होती.  तोतलाडोह धरणातून पेंच धरणात पाणी सोडले जात आहे, याची माहीती अभियंत्यांना चार तासापूर्वीं देण्यात आली होती. पेंच धरणाची पाण्याची पातळी वाढणार हे माहीत असूनदेखिल धरणातील पाण्याचा विसर्ग करणे क्रमप्राप्त होते. पण आधीच ८५पेक्षा अधिक जलसाठा पेंच धरणात होता. धरण पाण्याने फुगत असताना ‘ओव्हरफ्लो’ होऊनसुद्धा पाण्याचा विसर्ग करुन पाण्याची पातळी ठेवण्यात आली नाही.  पेंच धरणात शंभर टक्के (३२५ मीटर ) च्या वर पाणी जमा झाल्याने धरणाला धोका निमार्ण झाला. त्यातच घाईगडबडीत पेंच धरणाचे दरवाजे एकाच वेळी सहा मिटरने उघडून त्यातून पेंच नदीला पाणी सोडण्यात आले. त्याच वेळी पेंच नदीला महापूर आला आणि या महापुरात नदीकाठच्या गावांना पाण्याने  धोका निर्माण होऊन हाहाकार उडाला होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे  आहे. या सर्व प्रकरणात सिंचन विभागाचे अभियंते दोषी असल्याने पेंच धरणाला धोका निर्माण करणे,  राष्ट्रीय संपत्तीचे आर्थिक नुकसान करणे, नागरिकांचे जिवन धोक्यात घालणे, बेजबादारीने वागून पराक्रम करण्याच्या नादात धरणातून बेभान होऊन पाणी सोडून नदीला कृत्रिम महापूर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान करणे, अशा अनेक प्रकारचे आरोप या पत्रकारपरिषदेत शुभम राऊत, भूपेंद्र खोब्रागडे, इंद्रपाल खोब्रागडे, प्रमोद काकडे,  मोनू पठाण व अन्य शेतकऱ्यांनी पुराव्यासह केला व अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

हेही वाचाः संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे; डॉक्टरांच्या सल्ल्याने खवैय्ये, विक्रेत्यांच…
 

मी माझे कर्तव्य पार पाडले !
पेंच पाण्यासंदर्भीतील सगळा ‘डाटा’ मी वरिष्ठांकडे सोपविला होता. मी माझी जवाबदारी योग्यरित्या पार पाडली. वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशानुसार मला पाणी सोडणे भाग होते. ते मी केले.
प्रणय नागदीवे
उपकार्यकारी अभियंता

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is Pench's flood natural or artificial? Dispute erupts between villagers and officials