नागपूर विद्यापीठाच्या पुढे ढकललेल्या परीक्षा पुढील आठवड्यापासून, नवे वेळापत्रक जाहीर

मंगेश गोमासे
Friday, 2 October 2020

विद्यापीठाच्या परीक्षा एक ऑक्टोबरपासून घेण्याचे ठरले होते. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयीन कर्मचारीही सहभागी झाले होते.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे स्थगित करण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात आलेल्या आहेत. ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात येणार असून बीएची परीक्षा प्रथम होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली. विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र आता थेट विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा एक ऑक्टोबरपासून घेण्याचे ठरले होते. मात्र, ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. यामध्ये विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयीन कर्मचारीही सहभागी झाले होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाविद्यालयातील कर्मचारी कामावर नाहीत. परिणामी, महाविद्यालयांकडून अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना ओळखपत्र देता आले नाही. 

जाणून घ्या - नागपूरात सुरू आहे कोव्हॅक्‍सिन लसीचा प्रयोग!
 

कर्मचारी संपामुळे महाविद्यालयांच्या कामावर मोठा परिणाम होत असताना विद्यापीठ संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयांवर कशी टाकते, असा सवाल करीत प्राचार्य फोरमने परीक्षाच समोर ढकला, अशी मागणी केली होती. त्यातूनच परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला.

दरम्यान गुरूवारी (ता.१) विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संघटनांना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी चारपैकी तीन मागण्या मान्य करताना लवकरात लवकर त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे संघटनेने आंदोलन मागे घेण्याचे मान्य केले. आंदोलन मागे होताच विद्यापीठाने आज परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली. ८ ऑक्टोबरपासून बीए तर १२ तारखेपासून बीकॉम, अभियांत्रिकीच्या परीक्षा घेण्यात येतील.
 

प्रवेशपत्र मिळणार विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन

विद्यापीठाकडून पाठवण्यात आलेल्या परीक्षापत्रांचाही घोळ झाला होता. एका महाविद्यालयाचे परीक्षापत्र दुसऱ्याच महाविद्यालयाला गेले आहेत. नागपूरच्या कमला नेहरू महाविद्यालयाचे परीक्षापत्र कोराडी येथील एका महाविद्यालयाला पाठवण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या सर्व गोंधळामुळेही प्राचार्य फोरमने विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, हा घोळ टाळण्यासाठी आता विद्यापीठाने थेट https://www.rtmnuresults.org/student.aspx या संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची मुभा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय काही तक्रारी असल्यास महाविद्यालयांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University's online exam schedule announced