त्यांचे 'पूर्ण' पुनवर्सन करणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात गटात विभागलेल्या विदर्भातील नेत्यांच्या स्पर्धेमुळे वडेट्टीवारांना दुय्यम खाती देण्यात आल्याचा आरोप होत आहे. 

नागपूर : विजय वडेट्टीवारांच्या नाराजीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून त्यांना मदत व पुनर्वसन खात्याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. सोबतीला आणखी एक खाते देणार असल्याचेही कळते. 

दुय्यम खाती दिल्याने विजय वडेट्टीवार नाराज आहेत. त्यांनी आपल्या खात्याचा अद्याप पदाभारसुद्धा स्वीकारला नाही. मंत्रिमंडळाची बैठक आणि विशेष अधिवेशनाला अनुपस्थित राहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात होते. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी वडेट्टीवार यांच्या खच्चीकरणाचे षडयंत्र रचल्याचे त्यांचे निकटवर्ती सांगतात. स्वभावाने हट्टी असलेले वडेट्टीवार जुळवून घेणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नाराजीची दखल घेतली. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांना सध्या शिवसेनेचे संजय राठोड यांना देण्यात आलेले मदत व पुनर्वसन खाते देणार असल्याचे कळते. राठोड यांना वनखातेसुद्धा देण्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या आपसातील भांडणाचा फटका शिवसेनेच्या नेत्याला बसणार आहे. 

चिमुकलीला अंधारात बांधून तो झाला मोकळा

विजय वडेट्टीवार विरोधीपक्षनेते होते. चार वेळा ते चंद्रपूर परिसरातून निवडून आले आहेत. मोदी लाटेतही भाजपला त्यांचा पराभव करणे जमले नाही. अनेक नेते कॉंग्रेस सोडून जात असताना वडेट्टीवार यांनी विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. महाआघाडीची सत्ता आल्यावर त्यांना महत्त्वाचे खाते दिले जाईल अशी अपेक्षा वर्तविली जात होती. अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात गटात विभागलेल्या विदर्भातील नेत्यांच्या स्पर्धेमुळे त्यांना दुय्यम खाती देण्यात आल्याचा आरोप होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, vijay wadettiwar, politics, ministry