नागपूर ते वर्धा अंतर कापता येईल चाळीस मिनिटांत; नितीन गडकरींची संकल्पना

राजेश चरपे
Friday, 16 October 2020

ब्रॉडगेज मेट्रोचा डीपीआर तयार झाला आहे. प्रकल्पाची किंमत ३०५ कोटी असून राज्य शासनातर्फे २१.४ कोटी या प्रकल्पासाठी मिळतील. या मेट्रोच्या डीपीआरला रेल्वे बोर्डाने २०१९ मध्येच मान्यता दिली असून डीपीआरमधील काही त्रुटी आणि निधीसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता.

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमी वाहतुकीसंदर्भात नवनवीन संकल्पना मांडत असतात. नव्हे या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यातही त्यांचा हातखंडा आहे. ब्रॉडगेज मेट्रो रेल्वेच्या संकल्पनेतून आता वर्धेला केवळ ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील प्रमुख तालुके आणि शेजारचे जिल्हे ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे जोडण्याची संकल्पना सर्वप्रथम नितीन गडकरी यांनी मांडली होती. राज्याच्या मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिल्याने ती आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. याबाबत गडकरी यांनी राज्य शासनाचे आभारही मानले आहे.

शहरातील विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत नागपूरहून ब्रॉड गेज मेट्रो सुरू व्हावी आणि सुमारे शंभर किलोमीटरचा नागपूरजवळील परिसर ब्रॉडगेज मेट्रोने जोडला जावा, अशी संकल्पना गडकरी यांनी मांडली होती. याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश याच बैठकीत त्यांनी महामेट्रोला दिले होते. भारतीय रेल्वे, महाराष्ट्र शासन आणि महामेट्रो यांच्यात १६ जुलै २०१८ मध्ये करार करण्यात आला होता.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

ब्रॉडगेज मेट्रोचे नेटवर्क हे नागपूर ते वर्धा, नागपूर ते काटोल, नरखेड, रामटेक, भंडारा, वडसा देसाईगंज, चंद्रपूर, असे असेल. ब्रॉडगेज मेट्रोमुळे पूर्वीपेक्षा अर्ध्या वेळात प्रवास करणे शक्य होणार आहे. वर्ध्याला केवळ ३५ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे. शहरातील खापरी, अजनी आणि नागपूर रेल्वे स्टेशन इंटरचेंजसाठी जवळच्या मेट्रो स्टेशनमध्ये एकत्रित करण्यात येतील.

मुंबई लोकलप्रमाणे मेट्रो थांबेल

ब्रॉडगेज मेट्रोचा डीपीआर तयार झाला आहे. प्रकल्पाची किंमत ३०५ कोटी असून राज्य शासनातर्फे २१.४ कोटी या प्रकल्पासाठी मिळतील. या मेट्रोच्या डीपीआरला रेल्वे बोर्डाने २०१९ मध्येच मान्यता दिली असून डीपीआरमधील काही त्रुटी आणि निधीसाठी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. शहरातील महामेट्रोचा खर्च ३५० कोटी प्रती किलोमीटर असा असताना ब्रॉडगेज मेट्रोसाठी मात्र फक्त पाच कोटी प्रती किलोमीटर खर्च येणार आहे. ब्रॉडगेज मेट्रोसाठी मध्य रेल्वेचे ट्रॅक, सिग्नल आणि स्टेशनचा वापर केला जाईल. तासी १२० किलोमीटर या वेगाने ही मेट्रो धावणार असून प्रत्येक स्टेशनवर सुमारे एक ते दीड मिनीट (मुंबई लोकलप्रमाणे) एवढा वेळ मेट्रो थांबेल.

 संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur to Wardha can be reached in forty minutes