जेष्ठ नागरिकांनो, आता घरबसल्या भरा पाण्याचे बिल; ‘नागपूर वॉटर ॲप' ग्राहकांच्या सेवेत

राजेश प्रायकर 
Sunday, 4 October 2020

शहरात कोरोना विषाणूचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा धोका आहे. त्यामुळे पाण्याची देयके अदा करण्यासाठी झोन कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रातील गर्दीपासून त्यांना दूर ठेवण्याकरिता ओसीडब्लूने ऑनलाइन पद्धतीने देयके भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

नागपूर :  नागपूरकरांपर्यंत पाणी पोहोचविणाऱ्या ओसीडब्लूने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी पाण्याचे बिल घरूनच भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना झोन कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रात रांगेत उभे राहण्यापासून मुक्ती मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना नागपूर वॉटर ॲप, ओसीडब्लूच्या संकेतस्थळावरून थेट पाणी बिल भरता येणार आहे.

शहरात कोरोना विषाणूचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा धोका आहे. त्यामुळे पाण्याची देयके अदा करण्यासाठी झोन कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रातील गर्दीपासून त्यांना दूर ठेवण्याकरिता ओसीडब्लूने ऑनलाइन पद्धतीने देयके भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. यापूर्वीही ही सेवा सुरू होती. परंतु अनेक ज्येष्ठ नागरिक या सेवेपासून वंचित होते.

आता विशेषतः त्यांच्याकरिता पाणी बिल भरण्याचीच नव्हे तर पाण्यासंदर्भातील तक्रारीसंदर्भातही नागपूर वॉटर ॲप तसेच www.ocwindia.com या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नागपूर वॉटर ॲपद्वारे ज्येष्ठ नागरिकांना घरी बसूनच विविध सेवेचा लाभ घेता येणार आहे, असा दावा ओसीडब्लूने केला आहे. 

मोबाईल अप्लिकेशनसोबतच मनपा व ओसीडब्लूने पेटीएमची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना पाणीदेयकावर नमूद सीएएन क्रमांक आणि देय रक्कम यात भरावी लागणार आहे. 

भरणा केलेल्या रकमेची पावती पेटीएमकडून प्राप्त होईल. जमा केलेली रक्कम ग्राहकांच्या खात्यात २४ तासांत दिसून येईल. ज्येष्ठ नागरिकांना पेटीएमकडून अनेक सवलतीदेखील देण्यात येत असल्याचे ओसीडब्लूने नमूद केले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur water app has launched for old people to pay bills