भयंकर! "पब्जी'चा स्कोअर न झाल्याने नागपुरातील युवकाने घेतला गळफास

अनिल कांबळे
शनिवार, 6 जून 2020

सध्या मोबाईलवर युवा पिढीला पब्जी गेम खेळण्याचे फार वेड लागले आहे. याच पब्जीत निश्‍चित स्कोअर न करता आल्याने एका युवकाने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री नागपुरातील कपीलनगरात उघडकीस आली. शुभम लालाजी यादव (वय 24), असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

नागपूर : लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात फावला वेळ घालविण्यासाठी अनेक जण मोबाईलवर विविध गेम खेळतात. युवा पिढीला तर पब्जीचे फार वेड लागले आहे. याच पब्जीत "नेक्‍स स्टेप' न गाठता आल्यामुळे एका युवकाने नैराश्‍यात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभम लालाजी यादव (वय 24, रा. रमाईनगर, नारी रोड, कपिलनगर) असे आत्महत्या केलेल्या या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालाजी यादव यांचे नारी रोडवर छोटेसे गॅरेज आहे. त्यांना मुलगा शुभम आणि एक मुलगी आहे. शुभम बारावी झाल्यानंतर वडिलांना मदत म्हणून गॅरेजमध्ये काम करीत होता. सकाळी वडिलांसोबत गॅरेजमध्ये जाणे आणि त्यांच्यासोबतच घरी येणे, असा त्याचा नित्यक्रम होता.

शुभमला मोबाईलवर पब्जी खेळण्याचे वेड होते. त्यामुळे वेळ मिळाल्यानंतर तो मोबाईलवर पब्जी खेळत होता. काही दिवसांपासून शुभम तणावात होता. मात्र, त्याकडे कुटुंबाचे लक्ष गेले नाही. शुक्रवारी रात्री दहा वाजता शुभमने कुटुुंबीयांसोबत घरी जेवण केले. अकरा वाजताच्या सुमारास तो आपल्या खोलीत झोपायला निघून गेला. अकरा वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत तो मोबाईलवर पब्जी खेळला आणि व्हॉट्‌सऍपवर चॅटिंगसुद्धा केली. त्यानंतर त्याने खोलीचे दार बंद केले. बारा वाजताच्या सुमारास त्याची बहीण रूममध्ये ब्लॅंकेट देण्यासाठी गेली असता शुभम सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

बहिणीने जोरात किंचाळी फोडली. तिच्या आवाजाने आईवडिलांनी शुभमच्या खोलीकडे धाव घेतली. त्यांनी लगेच शेजारी राहणाऱ्या भावंडांना बोलावले. शुभमला खाली उतरून मेयोत दाखल केले. मात्र, तोपर्यंत शुभमची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी कपीलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शुभमने पब्जी खेळात आलेल्या अपयशामुळेच आत्महत्या केली असावी, असे निश्‍चित सांगता येणार नाही, पण शक्‍यता नाकारता येत नाही, असे कपीलनगर पोलिसांनी सांगितले.

क्‍या साली जिंदगी हैं...कुछ रखा नही

शुभमने रात्री बारा वाजताच्या सुमारास व्हॉट्‌सऍपवरून एका मैत्रिणीला मॅसेज केला. "क्‍या साला ये जिंदगी हैं...कुछा रखा ही नही.' असा मॅसेज त्याने तिला सेंड केला. तिकडून रिप्लाय आलाय, "काय झाले?..असा का बोलतोस?' मात्र, त्याने हसण्याची इमोजी टाकून विषय संपवला. त्यानंतर काही मिनिटाच्या आतच सिलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पब्जीमुळे आतापर्यंत पाच जणांचा बळी

पब्जीमुळे आतापर्यंत उपराजधानीत पाच तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये 9 नोव्हेंबर 2019 रोजी अर्पिता रजत गुप्ता (वय 19, साईबाबानगर) या युवतीने पब्जीमधून नैराश्‍य आल्याने आत्महत्या केली होती. अनेकांना असलेले पब्जीचे वेड मानसिकतेवर परिणाम करणारे आहे. सतत मोबाईलमध्ये डोके खुपसून खेळण्यात येणाऱ्या पब्जीमुळे एका 17 वर्षीय मुलीचे डोळे खराब झाले होते.

जाणून घ्या :  Video : विश्व महायुद्धाचे भाकित वर्तविल्याने खळबळ...वाचा संपूर्ण बातमी

मुलांना अशा गेम्सपासून लांब ठेवा
मोबाईलवरील ऑनलाइन विविध ऍप्स आणि गेम्स हे व्यक्तीला चटकन व्यसनात पाडणारे असतात. भावनिक जाळं निर्माण करून, त्यांचा वास्तवाशी संपर्क तोडून टाकतात. या भावनिक गुंतवणुकीमुळे व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडते. भावनेच्या भरात तो अपघातांना बळी पडतो. त्याला दुसरे कामं सांगितल्यास चिडचिड करतो. त्यामुळे पालकांनी मुलांना अशा गेम्सपासून लांब ठेवावे. काही लक्षणे आढळल्यास त्याचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. जेणे करून मुलावर मानसिक परिणाम होणार नाही.
- डॉ. राजा आकाश, मानसोपचार तज्ज्ञ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur youth commited suicide because pubg