Video : कुरूपतेला हरवून सौंदर्य प्रस्थापित करायला समशेरनगर निघाले; या वस्तीला मिळाली नवी ओळख, जाणून घ्या

Naming of Champa Pardhi Bedya, Unveiling of the statue of Krantiveer Samsher Singh Bhosale
Naming of Champa Pardhi Bedya, Unveiling of the statue of Krantiveer Samsher Singh Bhosale

चांपा (ता. उमरेड, जि. नागपूर)   आभाळाला बाप आणि जमिनीला आई मानत जगणारी माणसे चाळीस एक वर्षांपूर्वी भटकंती करत आश्रितासारखी चांपा गाववेशीच्या पल्याड स्थिरावली. गावाने कधी हिडिसफिडिस केले. जुलूम केले. पण, ज्यांच्यासाठी जन्मही पीडा आणि मरणही पीडा होती, त्यांनी हे सारेच वार सहन केले. आपलेपणाचे हात गावापुढे पसरले. गावच ते. पाझरले. वेशीपल्याड जिव्हाळ्याचे बंध पोहोचले. काळ्याकभिन्न आंडदांड देहांना गाववेशीत सामावून घेतले. चांपा गावाचा पारधी बेडा म्हणत उदार अंतःकरणाने गावात सामावून घेतले. आता व्होटिंगचे अधिकार मिळाले होते. लोक जरा अंतरावर का असेना गुण्यागोविंदाने राहू लागले.

शिक्षण तर वाघिणीचे दूधच, मग ते गुरुगुरायला लागले

दूर दिसणारे उजेडाचे इमले या बेड्यावरच्या दारिद्र्याला डिवचत असे. तरीही लोक जगले. काही मरण येत नाही म्हणून जगले. तर काही मरणाला मारत जगले. भाकरीच्या चंद्राभोवतीच आयुष्य फिरत होते. भुकेतून आलेले वैफल्य पाचवीलवाच पुजले होते. परंतु या वैफल्यालाही काही पुरून उरले. भूक भागविण्यासाठी कलंकित व्यवसाय करण्याला नकार देऊ लागले. दारू गाळणे बंद. चोरी करणे बंद. लाव्हे-तितर मारणे बंद. श्रमाला शरण जाऊ लागले. शेती करू लागले. कष्ट करू लागले. आपल्या मुलाबाळांना शिकवू लागले. याच वस्तीत अतिश आणि अनिल हे पवार बंधूद्वय शिकले. शिक्षण हे तर वाघिणीचे दूधच. मग ते गुरुगुरायला लागले. शिक्षणाने त्यांना अस्तेपणाची आणि नस्तेपणाची जाणीव झाली. मग ते बोलायला लागले. भुकेचा जाहीरनामा कधी तालुक्याच्या ऑफिसात तर कधी जिल्ह्याच्या ऑफिसात मांडू लागले. पारधी वस्तीतील लोकांचीच नव्हे तर चांपा गावातील सर्वांचीच बाजू ते घेवू लागले. गाव हरखले. मोहरले. अतिशला एकहाती सरपंचपद बहाल केले.

2014 मध्ये सुरू झाली बेडा नामांतरणाची चळवळ 

डीएड., एम.ए., बी.एड. झालेला अतिश हा तरुण आता गावासाठी झटू लागला. काळोखात जगणारा बेडा त्याच्या डोळ्यांपुढे होताच. पारधी बेडा हे जातिवाचक कुविशेषण मग त्याने काढायचे ठरविले. अनिलही जोडीला होताच. त्यांचे मामा आणि पारधी समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव गोरामन यांच्यासोबत ते बोलले. बबनरावांनी बेडा नामांतरणाची चळवळ 2014 मध्ये सुरू केली होती. बेडा नामांतरामुळे काय फरक पडतो, याचे उदाहरण त्यांनी वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिपरी पारधी बेड्याचे नामांतरण मुक्तिनगर करून सिद्ध केले होते. मग ठरले समेशरसिंग नगर नाव द्यायचे. क्रांतिवीर समशेर सिंग भोसले हे पारधी समाजात जन्मलेले थोर क्रांतिकारक. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांविरुद्ध निकराची लढाई करणारे. ब्रिटिश घुसखोरांना सळो की पळो करू सोडणारे. स्वातंत्र्य शाबूत राखण्याच्या प्रयत्नात वीरमरण पत्करणारे.

डॉ. रोहित माडेवार यांच्या हस्ते अनावरण 

रविवारी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नामकरण झाले. तेव्हा उजेडाच्या वर्षावात या नगरीतील नागरिकांचे जणू सर्वांग थरथरून गेले. डॉ. रोहितदादा माडेवार यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यातच आले. नागपूर जिल्ह्यातील चांपा पारधी बेड्याने वर्षानुवर्षे जातिवाचक वार झेलले. आता जुन्या जखमांना तिलांजली देत मोहरलेल्या मनाने माणूसपणाच्या नव्या लढाईस सज्ज झाले. चांपा पारधी बेड्याचे समशेरनगर नामकरण झाले. शिवाय या नगरात समशेरसिंग यांचा पूर्णाकृती पुतळा रोहितदादा यांच्या सहकार्यानेचे उभारण्यात आला.

पोलिस उपनिरिक्षक प्रमोद राऊत, बबनराव गोरामन, अजय वाघ, सुबोध जंगम, रेखा पवार, सरपंच अतिश पवार, उपसरंपच अर्जना सिरसाम, खुशाल ढाक, प्रदीप लेचे, सोनू गोरामन, लालचंद पवार, सुरेश मसराम, ईश्वर इरपाते, रंजित भोसले आदी मान्यवरांच्या साक्षीने हा परिवर्तनाचा सोहळा साजरा होत होता. क्रांतिवीर समशेर सिंग भोसले ऽऽ अमर रहे ऽऽ अमर रहे ऽऽ च्या गगनगामी गजरात सारे समशेर नगर मोहरून गेले. जातीवाचक काळोखातून उजेडाच्या उत्सवाकडे आता समशेर नगर झेपावायला निघाले. कुरूपतेला हरवून सौंदर्य प्रस्थापित करायला निघाले. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com