sakal

बोलून बातमी शोधा

New commissioner of Nagpur is strict like Tukaram mundhe

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयातील काही विभागांना आकस्मिक भेट देण्याच्या सूचना दिल्या.

हे तर जणू तुकाराम मुंढेच! नागपूरच्या नव्या आयुक्तांचा तब्बल ६६ अधिकाऱ्यांना दणका.. 

sakal_logo
By
राजेश प्रायकर

नागपूर : नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या ६६ कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘कारणे दाखवा’नोटीस बजावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही विभागांना आकस्मिक भेट दिली असता काही कर्मचारी उशिरा आल्याचे आणि काही कर्मचारी विनामंजुरी सुटीवर असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा - केल्याने होत आहे रे! भल्याभल्यांना जमले नाही ते करून दाखवले या गावाने; तब्बल ११ लाखांचे बक्षीस केले प्राप्त  

मंगळवारी (ता. १) मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयातील काही विभागांना आकस्मिक भेट देण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयातील वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाची पाहणी केली. या आकस्मिक पाहणीत या विभागातील काही कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर झाले नसल्याचे निदर्शनास आले. 

इतकेच नव्हे तर काही कर्मचारी रजेवर होते. चौकशी केली असता त्यांनी रजेचा कुठलाही अर्ज दिलेला नव्हता अथवा त्यांच्या रजेला पूर्वपरवानगी नव्हती. अशा कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६६ होती. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून त्या सर्व ६६ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशानुसार सदर नोटीस बजावण्यात आले.
 
क्लिक करा - "अहो बँकवाले बाबू, कधी होईल आमची कर्जमुक्ती?" बळीराजाचा विचारतोय सवाल    

वेळेवर उपस्थित न झाल्यास कारवाई : आयुक्त

कार्यालयात वेळेत उपस्थित होणे हा कार्यालयीन शिस्तीचा भाग आहे. त्यात कुठलीही कसूर चालणार नाही. त्यामुळे मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे. यात कुठलीही हयगय होता कामा नये. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे. शिवाय रजेवर जाताना नियमानुसार मंजुरी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

go to top