केल्याने होत आहे रे! भल्याभल्यांना जमले नाही ते करून दाखवले या गावाने; तब्बल ११ लाखांचे बक्षीस केले प्राप्त  

प्रमोद काकडे
Wednesday, 2 September 2020

मंगी (बु) गट ग्रामपंचायतीमध्ये खैरगुडा, कुडमेथेगुडा, रांजीगुडा, मंगी (खु.) या गावांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीने विकासाच्या जोरावर ‘स्मार्ट व्हिलेज’चा ११ लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे.

राजुरा (जि. चंद्रपूर) : जनतेने मनात घेतले तर काही पण करू शकते. तालुक्‍यातील मंगी (बु) येथील गावकऱ्यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर गावाला धूर, हागणदारी, प्लॅस्टिक व दारूमुक्त करून विकासाला नवी चालना दिली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय निधी व्यतिरिक्त लोकसहभागातून गावाचा कायापालट केल्याने या ‘विकास मॉडेल’चा आदर्श इतर ग्रामपंचायतींना प्रेरणादायी ठरत आहे. 

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?

मंगी (बु) गट ग्रामपंचायतीमध्ये खैरगुडा, कुडमेथेगुडा, रांजीगुडा, मंगी (खु.) या गावांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीने विकासाच्या जोरावर ‘स्मार्ट व्हिलेज’चा ११ लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. गावकऱ्यांच्या सहभागातून गावाची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. गावात रस्ते, स्वच्छता या विकासासोबतच लोकसहभागातून गावाला धूरमुक्त केले आहे. ग्रामस्थांनी घराशेजारी शोषखड्डे तयार केल्याने सांडपाण्याचा प्रश्‍नही सुटलेला आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय बांधण्यात आले आहे. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त झाले आहे. 

स्वच्छतेच्या जोरावर ग्रामपंचायतीला ‘संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार’ मिळाला आहे. त्यातूनच ८ लाखांच्या आरो प्लांटमधून ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर सुंदर व मनमोहक बाग तयार करण्यात आल्याने गाव सुंदर व हिरवेगार दिसत आहे. तसेच अंगणवाडीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. खुली व्यायामशाळा उपलब्ध झाला. त्याचा नियमित वापर होत आहे. 

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

शाळासुद्धा इतरांच्या नजरेत भरावी अशी सुविधायुक्त आहे. गावकऱ्यांनी विकासासोबतच आध्यात्मिक व सर्वधर्म समभावाची किनार दिली आहे. ग्रामपंचायतीने पाच वर्षांपासून गावाचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी विकासावर भर दिला आहे. गावाचा कायापालट करण्यासाठी अंबुजा सिमेंटचे कार्यक्रम अधिकारी श्रीकांत कुंभारे, रसिका पेंदोर, सरपंच वासुदेव चापले, उपसरपंच शंकर तोडासे, सदस्य वंजारे, ग्रामसेवक रत्नाकर भेंडे यांचा मोठा वाटा आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this village in chandrapur got smart village award