धक्‍कादायक... अजनी परिसरात आढळला कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून कामठी, सावनेरसह उपराजधानीत बुधवारी (ता.27) 13 जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. मेयो आणि एम्सच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून हे स्पष्ट झाले.

नागपूर : उपराजधानीतील नवीन वस्ती दररोज कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. मागील तीन दिवसांत नरेंद्रनगर, हावरापेठ, टिपू सुलतान चौक, सिरसपेठेत कोरोनाने शिरकाव केला. तर गुरुवारी (ता.28) अजनी क्वार्टर परिसरातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. अजनी क्वार्टर परिसरात रुग्ण आढळल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विशेष असे की, अजनी परिसरातील बाधितासह मोमिनपुरा, टिपू सुलतान चौक आणि सिरसरपेठेतील आठ जण बाधित आढळले. यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 454 वर गेली. शहरात आतापर्यंत 9 मृत्यू झाले असून, हा टक्का हळूहळू वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मेयोच्या संशयित वॉर्डात तो दाखल होता. यामुळे धोका कमी आहे.

बुधवारी सतरंजीपुरा येथील 71 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनाच्या बाधेने झाला. या महिलेचा मृत्यू घरीच झाला असून मृत्यूनंतर मृतदेह मेयो रुग्णालयात आणला. कोरोना हॉटस्पॉट परिसरातील महिला असल्याने कोरोना चाचणी केली. यात ती कोरोनाबाधित असल्याचे प्रयोगशाळेतून पुढे आले.

ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून कामठी, सावनेरसह उपराजधानीत बुधवारी (ता.27) 13 जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. मेयो आणि एम्सच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून हे स्पष्ट झाले. नागपूर शहरात आतापर्यंत 8 मृत्यू झाले असून बुधवारी 71 वर्षीय महिलेच्या मृत्यूने 9 व्या मृत्यूची नोंद झाली. ही महिला कोणाच्याही संपर्कात आली नसल्याचे सांगण्यात येते.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर या महिलेला मेयोत आणले असता, येथील डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूनंतर तिच्या घशातील आणि नाकातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. बुधवारी सकाळीच ही मृतक महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. शहरातील हा नववा मृत्यू असून सहा पुरुष आणि तीन महिलांचा या मृतकांमध्ये समावेश आहे. आज कोरोनाबाधितांमध्ये आलेल्या व्यक्तींमध्ये प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या हावरापेठेतील रहिवासी असलेल्या व्यक्तीची 51 वर्षीय पत्नी आणि 23 मुलगा कोरोनाबाधित आढळला.

याशिवाय कामठीतील 40 वर्षीय महिला, 39 वर्षीय पुरुष तसेच 4 वर्षीय मुलीचा अहवाल एम्सच्या चाचणीतून बाधित आला आहे. मेयो प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात मोमिनपुरा येथील गर्भवती मातेसह दोघे जण बाधित आढळले. याशिवाय सावनेर तालुक्‍यातील सोनाली गावातील एक तसेच शहरातील सतरंजीपुऱ्यातील दोन, बांगलादेशमधील दोन तर नाईक तलाव परिसरातील एक व्यक्ती बाधित असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले. नागपुरातील बांगलादेश, नाईक तलाव या नवीन वस्त्यांमध्ये बाधित आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली.

भाजप नेत्यांकडून आयुक्‍त तुकाराम मुंढेंचे कौतुक, वाचा काय आहे प्रकार...

पुणे मुंबईतून येणाऱ्यांचा धोका वाढला

कोरोनाचा विषाणूची बाधा असलेले व्यक्ती नागपुरात दाखल होत आहे. कोणी पायी तर कोणी खासगी वाहनातून निघाले. अनेक जण नागपुरात आल्यानंतर लपून राहात असल्याचे उघड झाले. ट्रकमध्ये लपून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात सोनाली गावचा व्यक्ती आल्याची चर्चा होती. याशिवाय दोन दिवसांपूर्वी मुंबईतून आलेल्यांपैकी तिघांना बाधा झाल्याचे उघड झाले. यामुळे पुण्या-मुंबईतून नागपुरात दाखल होणाऱ्या व्यक्तींपासून धोका वाढला आहे, अशी चर्चा विलगीकरण कक्षासह वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्येही आहे.

 

दररोज नवीन वस्तीत शिरकाव

शहरात अति संवेदनशील आणि संवेदनशील असे दोन भाग करण्यात आले. 11 मार्च रोजी बजाजनगर येथील पहिला व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर हळूहळू कोरोनाचा शिरकाव दक्षिण पश्‍चिम, उत्तर आणि मध्य नागपुरातील वस्त्यांमध्ये शिरला. अशाप्रकारे बजाजनगर, अभ्यंकरनगर, खामला, जयनगर, पांढराबोडी, रविनगर, काशीनगर, जवाहरनगर, एम्प्रेस सिटी, पार्वतीनगर, गणेशपेठ, जयभीमनगर, मोठा ताजबाग, मोमिनपुरा, टिमकी, बैरागीपुरा, गोळीबार चौक, हंसापुरी, सतरंजीपुरा, शांतीनगर, कुंदनलाल गुप्तनगर, दलालपुरा, इतवारी, राजीव गांधीनगर, संगमनगर, यशोधरानगर, जरीपटका, गौतमनगर, गिट्टीखदान, जरीपटका, कुशीनगर, खरबी, खलाशीनगर, हावरापेठ, संतोषनगर, नाईक तलाव, बांगलादेश इत्यादी वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.
 

शहरातील 9 मृत्यू

शहरात आतापर्यंत कोरोनाच्या बाधेमुळे 9 मृत्यू झाले आहेत. यात सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृतकांमध्ये मोमिनपुरा येथील 3, सतरंजीपुरा परिसरातील 2, पार्वतीनगर, पांढराबोडी, गड्डीगोदाम, शांतीनगर या वस्त्यांमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती दगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Corona Patient Found Ajni in nagpur