मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतींही गहिवरल्या... 

news about  born baby in mental hospital
news about born baby in mental hospital

नागपूर : रक्ताच्या नातेवाइकांचा नव्हे, तर तिला स्वतःचाही पत्ता ठावूक नाही. ती गतिमंद आहे. शहरातले ओसाड कोपरे तिचा मुक्काम पोस्ट. तिच्या असहायतेचा कुणीतरी गैरफायदा घेतला आणि ती गर्भवती राहिली. अशा बिकट अवस्थेत स्वतःचे भान हरवलेली, पत्ता हरवलेली ती गर्भवती माता मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीआड पोहोचली. दिवसांमागे दिवस जात राहिले आणि रविवारी (ता. 12) एका गोऱ्यापान गोंडस चिमुकलीचा जन्म झाला. प्रसूतीतज्ज्ञ डॉक्‍टरांनी नवजात शिशूला तळहातावर घेतले त्यावेळी कोवळ्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मनोरुग्णालयातील दगडी भिंतीही गहिवरल्या. परिचारिकांसह साऱ्यांनी मनोरुग्णालयात आलेल्या या अनामिकेच्या जन्माचा जल्लोष केला. 


एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कथा आहे प्रसूत झालेल्या पिंकी नावाच्या गर्भवती मातेची. तिला मिळालेले पिंकी नावदेखील मनोरुग्णालय प्रशासनाने कागदोपत्री सोपस्कारासाठी दिले आहे. स्वतःचा पत्ता हरवलेली पिंकी चार ते पाच महिन्यांपूर्वी रस्त्यावर गर्भवती अवस्थेत फिरत होती. कोण्या सामाजिक कार्यकर्त्याची नजर गेली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी न्याय दंडाधिकाऱ्यांद्वारे या महिलेस प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून मनोरुग्णालय तिचा आधार बनले. 

पिंकीवर प्रादेशिक मनोरुग्णालयात स्त्री व प्रसूतीरोगतज्ज्ञ डॉ. भारती किलनाकर (कोवे) यांच्या देखरेखीत उपचार सुरू होते. रविवारी प्रसवकळा सुरू झाल्या. रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी प्रसूती झाली. गोंडस बाळाला जन्म दिला. कोणत्याही आधुनिक सुविधा मनोरुग्णालयात नाही, तरी डॉ. भारती यांनी अतिशय काळजी घेत मनोरुग्ण महिलेचे बाळंतपण केले. आठव्याच महिन्यात प्रसूती झाल्याने कमी वजनाचे हे बाळ आहे. यामुळे मेडिकलच्या नवाजात शिशू काळजी कक्षात उपचार सुरू आहेत. 

आई हीच ओळख

 या बाळाला वडिलांची ओळख नसणार आहे. आठ महिने ज्या मातेने गर्भात वाढविले तीदेखील स्वतःचे खरे नाव सांगू शकत नाही. मात्र, या बाळाची ओळख त्याची आईच आहे. मात्र, आई गतिमंद आहे. यामुळे या नवजात शिशूला उपचारानंतर श्रद्धानंदपेठेतील अनाथालयाकडे सोपविण्यात येईल. एका उच्चशिक्षिताने चिमुकली जन्मतःच दत्तक मिळेल का? असेही विचारले. 

यापूर्वी "परी'चा राजकुमार

 प्रादेशिक मनोरुग्णालयात मागील दशकातील हे पहिलेच बाळंतपण आहे, असे सांगण्यात येत असले तरी 2017 मध्ये परी नावाची मनोरुग्ण महिला उपचाराला आली होती. तिच्या गर्भात साडेसहा महिन्यांचे मूल वाढत असल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले होते. बाळंतपणासाठी 9 व्या महिन्यांत श्रद्धानंद पेठ अनाथायालयामार्फत मेडिकलमध्ये भरती केले होते. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com