बचतगटांच्या बेजबाबदारपणाला लगाम घालण्यासाठी करणार हे...  

 news about nagpur nmc poshan aahar
news about nagpur nmc poshan aahar

नागपूर : शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या बचतगटांनी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू केल्याने संतापाचे वातावरण आहे. बचतगटांच्या बेजबाबदारपणाला लगाम घालण्यासाठी महापालिकेच्या विधी समिती समितीने आज शहरातील सर्व बचतगटांच्या स्वयंपाकगृहाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. सामान्य प्रशासन व विधी विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करून स्वयंपाकगृहाच्या तपासणीसाठी भरारी पथक तयार करावे, असे निर्देश विधी समिती सभापती ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले. 


विविध शाळांना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या विविधी संस्थांचे पितळ "सकाळ'ने उघडे पाडले. महिनाभरात ठळकपणे वृत्त प्रकाशित करून "सकाळ'ने बचत गटांचा बेजबाबदारपणा उघडकीस आणला. या वृत्तांची दखल घेत विधी समिती सभापती ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी विधी समितीच्या बैठकीत बचतगटांच्या शालेय पोषण आहाराच्या मुद्यावरून प्रशासनाची झाडाझडती घेतली.

कार्यादेश दिल्यानंतर जुलै 2019 मध्ये दोन संस्थेसंदर्भात तक्रार आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. मनपा आयुक्तांनी यावर सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर डिसेंबर महिन्यात सुनावणी झाली. 31 जानेवारी रोजी सुसंस्कार व प्रियदर्शिनी या दोन्ही संस्थेचे कंत्राट रद्द करण्यात आले. मात्र उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगनादेश दिला. पुढील सुनावणी 5 मार्च रोजी आहे, अशी माहिती यावेळी विधी अधिकाऱ्यांनी दिली. यावर अन्य सर्व संस्थांच्याही स्वयंपाकगृहाची भरारी पथकाद्वारे तपासणी करण्यात यावी. या पथकामध्ये मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाचा आणि विधी विभागाच्या प्रतिनिधीचा समावेश करावा, यासह भरारी पथकाने 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देशही सभापती ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

यासंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करून संबंधित संस्थांची पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीत विधी समितीच्या सदस्य मनीषा धावडे, मंगला लांजेवार, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, आयटीविभागाचे संचालक महेश मोरोणे, सहायक आयुक्त महेश धामेचा, समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेश राहाटे, स्थावर अधिकारी राजेश अंबारे, जिल्हा शालेय पोषण अधिकारी गौतम गेडाम, सहायक विधी अधिकारी ऍड, प्रकाश बरडे, ऍड. सूरज पारोचे, विधी सहायक ऍड. राहुल झामरे, अधीक्षक (साप्रवि) मदन सुभेदार उपस्थित होते. 

"भांडेवाडी कपोस्ट डेपो परिसराला झोपडपट्टी घोषित करा' 


भांडेवाडी कंपोस्ट डेपो परिसरातील 500 मीटर सभोवतालचे क्षेत्र झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, अशी जनतेची मागणी आहे. महानगरपालिकेच्या महासभेने 300 मीटर सभोवतालच्या क्षेत्राला झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्याचा आधार घेत आणि शासनाच्या निर्देशाच्या अधीन राहून यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश सभापती ऍड. मेश्राम यांनी दिले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com