प्रभारींच्या खांद्यावरच नागपूर विद्यापीठाचा भार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

नियमानुसार आठ एप्रिल रोजी कुलगुरू निवृत्त होत असल्याने त्याच दिवशी नव्या कुलगुरूने पदभार स्वीकारणे अपेक्षित असते. मात्र, समितीची स्थापना झालेली नसल्याने ती स्थापन करून विद्यापीठाला जाहिरात द्यावी लागणार आहे.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे याच तारखेवर विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणे अपेक्षित असताना अद्याप कुलगुरू निवडीसाठी जाहिरात आलेली नाही. त्यामुळे आठ एप्रिलपर्यंत विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळणे अशक्‍य असल्याचे दिसून येते. यामुळे पदाचा कार्यभार प्रभारीच्या खांद्यावर राहणार आहे.

विद्यापीठाच्या संयुक्त समितीद्वारे कुलगुरू निवडीसाठी तयार करण्यात येणाऱ्या समितीवर कानपूर आयआयटीचे संचालक प्रो. अभय करंदीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. मात्र, अद्याप समितीचे सचिव म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव आणि अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्यात येतो.

संशयाचे भूत; पतीने भर रस्त्यात केले असे काही...

सध्या त्यांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे प्रक्रिया लांबण्याची शक्‍यता आहे. नियमानुसार आठ एप्रिल रोजी कुलगुरू निवृत्त होत असल्याने त्याच दिवशी नव्या कुलगुरूने पदभार स्वीकारणे अपेक्षित असते. मात्र, समितीची स्थापना झालेली नसल्याने ती स्थापन करून विद्यापीठाला जाहिरात द्यावी लागणार आहे. जाहिरात दिल्यावर किमान एक महिना अर्ज मागविणे, त्यानंतर छाननी आणि मुलाखत अशी प्रक्रिया यासाठी पंधरा दिवस ते महिनाभर लागतो.

ही प्रक्रिया दीड महिन्यात होणे शक्‍य नाही. त्यामुळे या प्रक्रियेला संपूर्ण मे उजाडणार असून, जून महिन्यात विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, तोपर्यंत कुलगुरू पदाची सूत्रे प्रभारीच्या खांद्यावर येण्याची शक्‍यता आहे.

 

संपूर्ण विद्यापीठ प्रभारींवर

विशेष म्हणजे, सध्या प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे आणि कुलसचिव डॉ. नीरज खटी दोघेही प्रभारी आहेत. यानंतर कुलगुरू पदही प्रभारीच्या भरवशावर राहणार असल्याने संपूर्ण विद्यापीठ प्रभारींच्या भरवशावर येण्याची शक्‍यता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about nagpur university