नासुप्र बरखास्ती केवळ कागदोपत्रीच...कॉंग्रेस सदस्यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीला तत्त्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्‍वभूमी होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा नासुप्रचे अधिकार गोठवून महापालिकेला नियोजन प्राधिकरण करीत असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. केवळ निवडणुकीत लाभ घेण्यासाठी नासुप्रचा राजकीय वापर करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केला.

नागपूर : भाजपने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नागपूर सुधार प्रन्यास बरखास्तीचा निर्णय जाहीर केला. परंतु, प्रत्यक्षात अजूनही नासुप्र बरखास्त झाली नाही. प्रत्यक्षात राजकीय लाभासाठी नासुप्रचा वापर केला गेल्याचा आरोप कॉंग्रेस सदस्यांनी केला. सत्ताधारी बाकावरील नगरसेवकांनीही नासुप्रचा राजकीय वापर केला, मात्र जनहितासाठी केल्याचे ठासून सांगत विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

सविस्तर वाचा - प्रेम म्हणजे प्रेम असतं...समलिंगी जोडप्यांचा कसा असतो "व्हॅलेंटाईन्स डे'?वाचा

नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीला तत्त्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्‍वभूमी होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा नासुप्रचे अधिकार गोठवून महापालिकेला नियोजन प्राधिकरण करीत असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. केवळ निवडणुकीत लाभ घेण्यासाठी नासुप्रचा राजकीय वापर करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केला. मुळात नासुप्रच्या कायद्यात हेतू पूर्ण झाल्यानंतर बरखास्तीबाबत स्पष्ट नमूद आहे. नासुप्रची शहरातील कामे पूर्ण झाली का? राज्य सरकारने नासुप्रच्या कायद्याचा आधार घेतला काय? असा प्रश्‍न त्यांनी केला. नासुप्रकडून मालमत्ता व दायित्व हस्तांतरणाबाबत समिती गठित करण्यात आली. परंतु, ही समितीही कुठलाच निर्णय घेऊ शकली नाही. जनतेला केवळ भ्रमित करण्यात आल्याचा आरोप गुडधे पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही राजकीय लाभासाठीच नासुप्रचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनीही विरोधकांच्या आरोपातील हवा काढत राजकीय लाभासाठी कॉंग्रेसने घेतलेल्या निर्णयाची यादीच स्पष्ट केली. आम्ही राजकीय निर्णय घेतला. मात्र, नासुप्र बरखास्तीचा निर्णय हा नागरिकांच्या हितासाठी होता, असे तिवारी यांनी स्पष्ट केले. या चर्चेत कॉंग्रेसचे संजय महाकाळकर, हरीश ग्वालवंशी, हर्षला साबळे, भावना लोणारे, नेहा निकोसे, किशोर जिचकार, परसराम मानवटकर, दिनेश यादव, दर्शनी धवड, पुरुषोत्तम हजारे, मनोज सांगोळे, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, अविनाश ठाकरे, वीरेंद्र कुकरेजा, स्वाती आखतकर, दिव्या धुरडे, पिंटू झलके, भूषण शिंगणे, राजेंद्र सोनकुसरे, सतीश होले, बसपाचे इब्राहिम टेलर, जितेंद्र घोडेस्वार, मोहम्मद जमाल यांनीही नासुप्र बरखास्त करण्याबाबत मत व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी पाठविलेले पत्र अपूर्ण
पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला पाठविलेले पत्र अपूर्ण आहे. या पत्रातील काही पाने गायब आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुद्दा 1, मुद्दा 2 यावर स्पष्टीकरण मागितले. परंतु, पत्रात मुद्देच नसल्याचे दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. हे पत्र पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक राजकारणासाठीच लिहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य शासनाकडून जोपर्यंत पूर्ण पत्र येत नाही, तोपर्यंत उत्तर न देण्याचा निर्णय महापालिकेने घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NIT dismissed only on paper