नितीन गडकरींनी केलं तुकाराम मुंढेंचं भरभरून कौतुक; म्हणाले... 

nitin gadkari praised Tukaram Mundhe in Nagpur
nitin gadkari praised Tukaram Mundhe in Nagpur

नागपूर ः कोरोनाच्या त्या भयानक परिस्थितीत अनेकांनी मोठे काम केले. ज्या काळात कुणाला हात लावायला काय, जवळ जायलाही लोक घाबरत होते, त्यावेळी कोरोना योद्ध्यांनी लोकांचे जीव वाचवले. तत्कालिन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, त्यानंतर आयुक्त राधाकृष्णन, तत्कालीन पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरात केलेल्या व्यवस्थेमुळे अनेकांचे जीव वाचले. औषधीअभावी कुणाचाही जीव जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. महापालिकेला औषध बॅंक तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

अनेक गरीबांना पैशाअभावी औषधी मिळत नाही. अशा लोकांसाठी औषध बॅंक सुरू करता येईल काय? याबाबत महापालिकेने विचार करावा, असा सल्ला गडकरींनी आज दिला. दान म्हणून औषधी देणाऱ्यांचाही शोध घ्या, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. कोरोना काळात समाजातील सर्वांनीच केलेली सेवा ही ईश्वर सेवा होती, प्रत्येकाचे काम हे प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले.

महापालिकेतर्फे रेशिमबाग येथील सुरेश भट सभागृहात कोविडच्या काळात शहरातील नागरिकांना मदत करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा गौरव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. व्यासपीठावर आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा आदी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात कुणीही एकमेकांना हात लावण्यापासून भीत होते. अशा भीतीच्या काळात सामाजिक संस्था, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गरीब, गरजुंच्या सेवेचे व्रत पार पाडले.

अजुनही अनेकजण कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोनाची लस घ्या, अजूनही संकट टळले नाही, असे नमुद करीत त्यांनी संकटाच्या या काळात गरीबातील गरीब व्यक्तीनेही योगदान दिले. आयुक्त तुकाराम मुंढे, त्यानंतर आयुक्त राधाकृष्णन, तत्कालीन पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरात केलेल्या व्यवस्थेमुळे अनेकांचे जीव वाचले. औषधीअभावी कुणाचाही जीव जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी महापालिकेला औषध बॅंक तयार करण्याचा सल्ला दिला.

यावेळी त्यांनी औषध कंपन्यांवरही तोंडसुख घेतले. उत्पादनाचा खर्च अन् विक्री किंमत यावर लक्ष घालण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी केले. संचालन उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी केले. कोरोना काळात सामाजिक संस्थांनी लोकांसाठी धान्य, भाजीपाला, जेवणाचे पॅकेट पुरविण्याची जबाबदारी घेतल्यानेच महापालिका स्वच्छता, बेडची संख्या वाढविण्याचे काम करू शकली, असे महापौर दयाशकंर तिवारी म्हणाले. नगरसेवकांनी आयुक्तांना स्वतंत्रपणे काम करू दिले. या काळात खाजगी रुग्णालयांसोबतच मेयो, मेडिकल, एम्सने केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com