"रेड झोन'बाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंनी घेतली ही भूमिका..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

नागपूर रेडमधून बाहेर आले असून लॉकडाउन शिथिल करण्यासंदभाचे वृत्त शहरात पसरले होते. याबाबत आयुक्तांनी स्पष्ट शब्दात अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने रेड झोन व बिग रेड झोन, अशी विभागणी केली असून शिथिलतेसंदर्भात नवे आदेश काढले. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी 22 मेपासून केली जाणार आहे. त्यामुळे नागपूर शहर अद्यापही रेड झोनमध्येच आहे, असे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन दिवसांत तीन मृत्यू झाले, शहराचा धोका टळला नाही. नागरिक, दुकानदारांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

दिवसभर आज नागपूर रेडमधून बाहेर आले असून लॉकडाउन शिथिल करण्यासंदभाचे वृत्त शहरात पसरले होते. याबाबत आयुक्तांनी स्पष्ट शब्दात अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन केले. लॉकडाउनसंबंधी शहरात 17 मे आणि त्यापूर्वी काढलेले आदेश सध्या अस्तित्वात आहेत. शहरातील परिस्थिती पाहून नवीन आदेश 22 मे रोजी काढण्यात येईल. शहराला कायमस्वरूपी रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी सध्या आहे त्या आदेशाचे सर्वांनी पालन करणे आवश्‍यक आहे. शहरात अजूनही हॉटस्पॉट असून कोरोनाबाधित पुढे येत आहे. अनेकांना विलगीकरणात पाठवून उपचार करण्यात येत आहे. शहराची परिस्थितीही राज्य सरकारला कळविण्यात येईल असे नमूद करीत 17 मे रोजीचे आदेश लागू आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, प्रशासनिक कायदा आणि भारतीय दंड विधान कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

22 मेपर्यंत बाजू मांडण्याचे न्यायालयाचे आदेश 
शहराला राज्य शासनाने शहर रेड झोनमधून वगळले असल्याची माहिती ऍड. सुधीर पुराणीक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. 22 मेपर्यंत आहे तीच परिस्थिती लागू राहणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. यावर महापालिकेला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने 22 मेपर्यंत वेळ दिला आहे. पुढील सुनावणी 22 मे रोजी होणार आहे. याचिककर्त्यातर्फे ऍड. श्‍याम देवाणी यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शहरातील वकील प्रकाश जयस्वाल, कमल सतुजा, मनोज साबळे आणि श्रीरंग भांडारकर यांनी आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. 

- होम क्वॉरान्टाईनचा शिक्‍का असलेल्या व्यक्‍तीचा रस्त्यावर तडफडून मृत्यू

हे राहणार सुरू 
- घरपोच मद्यविक्री, नागरी क्षेत्रातील बांधकाम, आयटी कार्यासाठी आवश्‍यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्‍ट्रिक सामग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अप्लायन्सेस दुरुस्ती, ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑइल आणि लुब्रिकेन्ट्‌स शॉप, ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियरी कापड दुकाने (प्रतिबंधित क्षेत्र वगळता), जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने, खासगी कार्यालये 15 टक्के तर शासकीय कार्यालये 33 टक्के उपस्थितीसह. 

हे राहणार बंद 
- जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्‍सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण तलाव, जिम, सलून, ब्युटी पार्लर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nmc commissioner tukaram mundhe clarify about red zone