सावधान ! तुमच्याही भूखंडांचा होऊ शकतो लिलाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

स्वच्छतेबाबत महापालिकेने कठोर पावले उचलली असल्याने हा ठराव मंजूर होण्याची शक्‍यता आहे. ठराव मंजूर झाल्यानंतर शहरातील मोकळ्या भूखंडांवर महापालिका लक्ष केंद्रित करणार आहे. परिणामी आता मोकळ्या भूखंडांवरील कचऱ्यामुळे नागरिक नव्हे, तर भूखंडमालकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

नागपूर : शहरातील मोकळ्या भूखंडांनी स्वच्छतेला ग्रहण लावले आहे. ते जप्त करून लिलाव करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केला आहे. नोटीस देऊनही स्वच्छता न केल्यास भूखंडमालकावर प्रति चौरस मीटर 50 रुपये दंड आकारण्याचेही प्रस्तावित आहे. येत्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आता मोकळे भूखंड नागरिकांसाठी नव्हे, तर मालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.
शहरातील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. या भूखंडांवर कचरा जमा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. मोकळ्या भूखंडांवर कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढते. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, आतापर्यंत महापालिकेकडे मोकळ्या भूखंडांवर कारवाईबाबत कुठलेही धोरण नसल्याने मोकळे भूखंडमालकही मस्तवाल झाले होते. याशिवाय शहरात अनेक भूखंडांच्या मालकांचाही पत्ता नाही. त्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी, असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

सविस्तर वाचा - पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले, प्रत्येक शेतकरी कुटुंबाला संरक्षण

आता या सर्व बाबींवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तोडगा काढला आहे. कचरा असलेल्या भूखंडांच्या मालकांची माहिती असल्यास सर्वप्रथम त्याला दोन दिवसांत स्वच्छता करण्याबाबत नोटीस देण्यात येणार आहे. दोन दिवसांत स्वच्छता न केल्यास महापालिका भूखंड स्वच्छ करून मालकांकडून प्रति चौरस मीटर 50 रुपये दंड आकारणार आहे. दंड न भरल्यास किंवा स्वच्छतेनंतरही कचरा आढळल्यास भूखंड जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येईल. भूखंडमालकांचा पत्ता मिळाल्यास भूखंड जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला आहे. येत्या 27 जानेवारीला स्थायी समितीची बैठक आहे. त्यात हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. स्वच्छतेबाबत महापालिकेने कठोर पावले उचलली असल्याने हा ठराव मंजूर होण्याची शक्‍यता आहे. ठराव मंजूर झाल्यानंतर शहरातील मोकळ्या भूखंडांवर महापालिका लक्ष केंद्रित करणार आहे. परिणामी आता मोकळ्या भूखंडांवरील कचऱ्यामुळे नागरिक नव्हे, तर भूखंडमालकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

शहरात लाखो भूखंड
शहर सीमेवरील वस्त्यांमध्ये अनेकांनी भूखंड खरेदी केले. अनेकांनी केवळ गुंतवणुकीसाठी भूखंड खरेदी केले असून, वर्षानुवर्षे त्याकडे ढुंकूनही पाहिले नसल्याने तेथे झुडपे वाढली आहेत. असे शहरात लाखो भूखंड असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. त्यामुळे भूखंडांचा लिलाव किंवा त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMC declears auction of empaty plots with garbage