मनपाने कुणावर चालविला हतोडा आणि कशासाठी ?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

महापालिकेने अनधिकृत बांधकामावर लक्ष केंद्रित केले असून, आज चार झोनमध्ये कारवाई करण्यात आली. धरमपेठ, नेहरूनगर, आसीनगर व मंगळवारी झोनच्या विविध भागांतील अतिक्रमण तोडण्यात आले.

नागपूर : महापालिकेने अनधिकृत बांधकामावर लक्ष केंद्रित केले असून, आज चार झोनमध्ये कारवाई करण्यात आली. धरमपेठ, नेहरूनगर, आसीनगर व मंगळवारी झोनच्या विविध भागांतील अतिक्रमण तोडण्यात आले.

तुकाराम मुंढे यांनी मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक निर्णय घेतले. त्यापैकी अनधिकृत बांधकामावर हतोडा चालविण्याचा निर्णयही त्यापैकी एक होय. धरमपेठ झोनमधील क्रेझी कॅसल वॉटर अँड ऍम्युझमेंट पार्कच्या परिसरातून नागनदी वाहते. नदीच्या पात्रावर पार्कच्या मालकाकडून दोन मोठ्या लोखंडी पुलाची निर्मिती करण्यात आली होती. अतिक्रमण विभागाद्वारे संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली. नोटीसची दखल घेत पार्कच्या मालकाकडून दोन्ही पूल हटविण्यात आले आहेत. नेहरूनगर झोनमधील दर्शन कॉलनी येथे नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर गोदाम, प्रसाधनगृह व स्टोअर रूमचे बांधकाम करण्यात आले होते. हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

वाचा - तरुणीचा फोन येताच गंतव्यस्थळ गाठले, पण पुढे घडला हा प्रकार...

मंगळवारी झोनमध्ये सदर येथील लिंक रोडवर तब्बल तीन हजार चौरस फूट जागेमध्ये अनधिकृतरीत्या गॅरेज तयार करण्यात आले होते. अतिक्रमण पथकाने कारवाई करीत संपूर्ण बांधकाम तोडले. जरीपटका रहिवासी वापरासाठी असलेल्या जागेतील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे गोदाम कारवाईदरम्यान सील करण्यात आले. या झोन अंतर्गत एक मोठे शिकस्त घरही पाडण्यात आले.

नदी पात्र, घाटातील अतिक्रमण हटविले
आसीनगर झोनमधील विदर्भ डिस्टीलरीज या देशी दारू निर्मिती करणाऱ्या कंपनीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. अतिक्रमण पथकाद्वारे संपूर्ण बांधकाम तोडण्याची कारवाई करण्यात आली व 50 हजारांचा दंड आकारण्यात आला. पिवळी नदी पात्रातील अनधिकृतरीत्या झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. नारी घाटातील अतिक्रमण काढले. नेहरूनगर झोनअंतर्गत दानिश लॉनचे अनधिकृत शेडचे अतिक्रमण काढण्यात आले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NMC remove encroachment in four zone of city