होतोय एक कोटींचा "दानधर्म' पण वैदर्भीय रंगकर्मींच्या हाती आलाय "नारळ'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील विस्तारलेल्या शाखांमधून नाट्यकर्मीना अन्न धान्य, आर्थिक सहाय्य करण्यात आले असल्याचे अध्यक्ष प्रसाद कांबळी म्हणाले. काही शाखानी रक्तदानाचे उपक्रम देखील राबविले. मात्र यात विदर्भाची आकडेवारी कुठेही प्रकाशात आलेली नाही.

नागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी गरजू नाट्यकर्मींना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद एक कोटी वीस लाख रुपयांचे सहकार्य करणार असल्याची घोषणा अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली आहे. मात्र दूर्देवाने यात एकाही वैदर्भीय रंगकर्मीचा समावेश नाही. विशेष म्हणजे हा दानधर्म करताना मध्यवर्ती शाखेला साधी विचारणा देखील करण्यात आलेली नसल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे "अखिल भारतीय' असा उल्लेख होत असलेल्या संस्थेने "विदर्भाला वेगळे' केले का ? असा सवाल रंगभूमी कलावंत विचारत आहेत. 

नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक, प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे, प्रवक्ते मंगेश कदम तसेच व घटक संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ही मदत कोणाला करण्यात येणार आहे व दानदात्यांची माहिती त्यांनी दिली. मदतीचा लाभ 50 व्यवस्थापक, 30 बुकिंग क्‍लार्क, 150 कलाकार, 30 निर्माते तसेच आठशेहून अधिक रंगमंच कामगार, डोअर किपर, बुकींग क्‍लार्क यांना होणार आहे. मात्र यात एकही विदर्भातील रंगकमी नसेल हे आता स्पष्ट झाले आहे. तर ही मदत केवळ व्यवसायिक रंगकर्मींना देण्यात येणार असल्याचे मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी सांगितले आहे. 

वाचारियल हिरो सोनू सूद म्हणाला, 'थॅंक यू सो मच'

परिषदेतर्फे करण्यात येणारी मदतीची रक्कम थेट गरजू नाट्यकर्मीच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यात नाट्यपरिषदेने दोन गट तयार केले असून, एक हौशी रंगकर्मींचा तर दुसरा व्यवसायिक रंगकर्मींचा आहे. रंगभूमीच्या भरवशावर निर्भर असलेल्या गरजू रंगकर्मींना हे आर्थिक सहकार्य करण्यात येणार असून, विदर्भात अशा रंगकर्मींची संख्या नाममात्र असल्याचे नरेश गडेकर म्हणाले. 

वाचाबोंबला! नागरिकांनी केली पार्टी अन् ७०० लोकांना व्हावे लागले क्वारंटाईन

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी महाराष्ट्रात शंभरावे नाट्यसंमेलन थाटात होणार होते. या आयोजनात देखील विदर्भाचा उल्लेख कायम टाळण्यात आला हे सर्वश्रृत आहे. यंदा इतक्‍या मोठ्या संकटात सापडलेल्या एकाही वैदर्भीय रंगकर्मीची नाट्यपरिषदेला साधी विचारपूसही करावी असे वाटले नाही. त्यामुळे ज्या संघटनेच्या नावासमोर "अखिल भारतीय' असा उल्लेख होतो त्यात वैदर्भीय रंगकर्मींना कुठेही स्थान असल्याचे दिसून येत नसल्याची चर्चा स्थानिक कलावंतांमध्ये आहे.

वाचा : मरणोत्तर करा संकल्प, अनमोल डोळे दानाचा

या महामारीत परिषदेच्या विविध जिल्ह्यातील विस्तारलेल्या शाखांमधून त्या त्या ठिकाणच्या नाट्यकर्मीना अन्न धान्य, आर्थिक सहाय्य करण्यात आले असल्याचे अध्यक्ष प्रसाद कांबळी म्हणाले. काही शाखानी रक्तदानाचे उपक्रम देखील राबविले. मात्र यात विदर्भाची आकडेवारी कुठेही प्रकाशात आलेली नाही. तर मध्यवर्ती शाखेने गरजू रंगकर्मींची यादी पाठवली, याबाबत माहिती नाही. रंगभूमीवर निर्भर असलेल्या वैदर्भीय कलावंतांना आर्थिक मदत मिळेल का ? हे देखील सांगता येत नसल्याचे अ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य शेखर बेंद्रे म्हणाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No financial aid given to the artist of vidarbha.