कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलीसांचा उरला नाही धाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

11 मे 2017 ला यशोधरानगरमध्ये कुख्यात गुंड प्रवीण लांजेवार (22) याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी फरदीन खान मुजीब खान ऊर्फ शेर खान (20) आणि समीर ऊर्फ बाबा याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून प्रवीणचे साथीदार समीरचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. ते संधी शोधत होते.

नागपूर : उपराजधानीत एकाच दिवशी दोन हत्याकांड उघडकीस आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पहिले हत्याकांड वनदेवीनगरात तर दुसरे वाठोड्यात घडले. नवदेवीनगरातील हत्याकांड हे बदल्याच्या भावनेतून घडल्याची चर्चा आहे. शेख समीर ऊर्फ बाबा शेख रमजान (24, रा. इंदिरामातानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर वाठोड्यात खून झालेल्या युवकाची अद्याप ओळख पटली नाही.

हे वाचाच - शिरी-फरहाद, हिर-रांझा, सलीम-अनारकली आणि...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मे 2017 ला यशोधरानगरमध्ये कुख्यात गुंड प्रवीण लांजेवार (22) याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी फरदीन खान मुजीब खान ऊर्फ शेर खान (20) आणि समीर ऊर्फ बाबा याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून प्रवीणचे साथीदार समीरचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. ते संधी शोधत होते. प्रवीणच्या हत्याकांड घडले तेव्हा आरोपी बाबा हा अल्पवयीन होता. अठरा वर्षे पूर्ण होण्यासाठी त्याला काही महिने बाकी असल्यामुळे त्याचा लाभ त्याला मिळाला आणि त्याची प्रकरणातून सुटका झाली. सुटून आल्यानंतर तो परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. विरोधी गट त्याचा "गेम' करण्याची संधी शोधत होता. मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास बाबू बिनाकी मंगळवारी परिसरातील रिगल सेलिब्रेशन हॉलजवळ उभा होता. त्याचवेळी तोंडावर कापड बांधून असलेले 7-8 तरुण त्याच्या मागे शस्त्र घेऊन धावले. वाचण्यासाठी तो आर.के.सावजी भोजनालयाच्या मागच्या दाराने आत घुसला. हल्लेखोरही त्याच्या मागे भोजनालयात घुसले. हल्लेखोरांच्या हातात शस्त्र पाहून घाबरलेल्या कामगारांनी तेथून पळ काढला. हल्लेखोरांनी बाबाला घेरून सपासप त्याच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळून घटनास्थळावरच त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपी तेथून फरार झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यशोधरानगर पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून बाबूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात रवाना केला. माहिती मिळाली आहे की, प्रवीणचे साथीदार अनेक दिवसांपासून बाबाचा गेम करण्याची योजना आखत होते. तो एकटा भेटण्याची संधी शोधत होते. मंगळवारी बाबू त्यांना एकटा आढळला आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक साखरे हे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी काही आरोपींना रात्री उशिरापर्यंत ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

फिल्मी स्टाइलने केला मर्डर

विरुद्ध गॅंगमधील काहीजण आपला पाठलाग करीत असल्याची चाहूल समीरला लागली होती. याकरिता तो स्वत:चा जीव वाचवण्यासाठी लपत लपत घर गाठण्याचा प्रयत्न करीत होता. याकरिता त्याने ठरावीक अंतरावर दोन ते तीन सावजी हॉटेलमध्ये थांबण्याचा प्रयत्न केला. आनंदनगर ते कांजीहाउस बिनाकी मंगळवारीदरम्यान तो बचावला. पण, वनदेवीनगर परिसरात आरोपींनी सावजी हॉटेलमध्ये घुसूनच त्याच्यावर हल्ला केला.

सीसीटीव्हीची मदत

पोलिसांनी सावजी भोजनालयात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. यामध्ये काही आरोपी चेहऱ्याला कापड बांधून जाताना दिसत आहेत. पोलिस फुटेजवरून आरोपींचा शोध घेत आहेत.

दगडाने ठेचून हत्या

यशोधरानगरातील हत्याकांडाने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असतानाच मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास खुनाची दुसरी घटना वाठोडा पोलिस स्टेशनअंतर्गत गंगा सेलिब्रेशन परिसरात उघडकीस आली. दगडाने डोके ठेचून 25 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. मृतकाची ओळख पटलेली नाही. तो मजूर असावा,अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. दोन युवकांचा वाद सुरू होता. दोनपैकी एका युवकाने अचानक मित्रावर दगडाने हल्ला केला. तो खाली पडल्यानंतर दगडाने ठेचून मित्राचा खून केल्याची माहिती वाठोड्याचे पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांनी सांगितली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No one is afraid of law and order and police